पावसाळा जवळ येत असतानाच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला असून या निर्णयाचा फटका पावसाळ्यात मुंबईकरांना बसण्याची शक्यता आहे.
नव्या विभागाची कल्पना नसल्याने पावसाळ्यात तेथे काम कसे करायचे, असा प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन पावसाळ्यानंतर या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये २७ आरोग्य कार्यकारी अधिकारी आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. पावसाळ्यात मलेरिया निर्मूलन आणि साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे अधिकारी कार्यरत असतात.
पालिका प्रशासनाने २७ आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांपैकी सात जणांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ए, डी, के-पूर्व, एम-पश्चिम, एन, टी-दक्षिण आणि एच-पूर्व विभागातील आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होऊ घातल्या आहेत. पावसाळा तोंडावर असताना या बदलीसत्रामुळे हे अधिकारी चक्रावले आहेत.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना पावसाळ्यात सतर्क राहावे लागते. आपापल्या विभागातील सखलभागात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती होऊ नये यावर या अधिकाऱ्यांना लक्ष ठेवावे लागते.
कीटकनाशकांची फवारणी, झोपडपट्टय़ा-चाळींमधील पाण्याच्या पिंपात औषध टाकणे आदी कामांवर या अधिकाऱ्यांची बारीक नजर असते. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्या विभागाचा अभ्यास करुन हे अधिकारी उपाययोजना करीत असतात. परंतु आता मे महिन्यात अचानक बदलीचे संकेत मिळाल्याने हे अधिकारी चक्रावले आहेत. नव्या विभागाची साधी तोंडओळखही नसल्याने तेथे काम कसे करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
मार्च-एप्रिलमध्ये बदल्या केल्या असत्या तर नव्या विभागाचा अभ्यास या अधिकाऱ्यांना करता आला असता. त्यामुळे आता पावसाळ्यानंतर या अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.