मुंबई : कबुतरखान्यांबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवून अंतिम निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने महापालिकेला दिल्या होत्या. त्यानुसार आता कार्यवाही करून महापालिकेने मुंबईतील चार ठिकाणी कबुतरांना नियंत्रितरीत्या दाणे टाकण्याची परवानगी दिली आहे. या चार ठिकाणी दररोज फक्त सकाळी ७ ते ९ या कालावधीतच कबुतरांना दाणे टाकता येणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत कबुतरखान्यांचा वाद चर्चेत आला आहे. कबुतरांची पिसे व विष्ठेमुळे श्वसनाचे आजार होत असल्यामुळे राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने मुंबईतील कबुतरखाने बंद केले. त्यांनतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत कबुतरखाने पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मात्र ते शक्य नसल्याचे लक्षात येताच त्यांनी ठरावीक वेळेत कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

याबाबत न्यायालयातही धाव घेण्यात आली होती. त्यांनतर कबुतरांना ठरावीक वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याबाबतच्या तीन अर्जांवर पालिकेने नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या. त्यानुसार आता मुंबईत चार ठिकाणी सकाळी दोन तासांच्या कालावधीतच कबुतरांना खाद्य टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. अन्य कोणत्याही वेळेत दाणे पुरवता येणार नाहीत. तसेच या चारही जागांवर कबुतरखान्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे आल्या तरच ही परवानगी देण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.

कबुतरांना दाणे पुरवल्यामुळे परिसरात वाहने व पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये, कबुतरखान्याच्या जागी संपूर्ण स्वच्छता राखणे, नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणे, या सर्व बाबींची दक्षता संबंधित संस्थेला घ्यावी लागेल. त्याअनुषंगाने संस्थेकडून प्रतिज्ञापत्रदेखील घेतले जाणार आहे. कबुतरखान्यांच्या या व्यवस्थापनामध्ये संबंधित प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त समन्वय अधिकारी असतील. या कबुतरखान्यांच्या परिसरात आरोग्याविषयी जनजागृतीसाठी फलकही लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून महापालिकेकडे एकूण ९,७७९ सूचना व हरकती, तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाना बंद करणे, सुरू ठेवणे, स्वच्छता राखणे, नियंत्रित पद्धतीने दाणे पुरवणे अशा सर्व पैलूंचा समावेश आहे. विद्यमान कबुतरखाने सुरू करण्यास मात्र परवानगी दिलेली नाही. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदच राहतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी कुठे?

जी – दक्षिण विभागातील वरळी जलाशय (वरळी रिझर्व्हायर)

अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर

मुलुंड येथील खाडी परिसर बोरिवलीतील गोराई मैदान