विरोधी पक्षांची मागणी प्रशासनाने केली मान्य

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पासाठी लोकसहभाग असावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे नगरसेवकांच्या सूचनांशिवाय तयार करण्यात येणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> PM Modi Mumbai Tour : मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्वीट, म्हणाले…

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा चालू आर्थिक वर्षीचा अर्थसंकल्प ४० हजार कोटी रुपयांचा होता. एका राज्याच्या अर्थसंकल्पाइतके या अर्थसंकल्पाचे आकारमान असते. मार्च २०२२ मध्ये महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत हा अर्थसंकल्प सादर होत असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून, लोकप्रतिनिधी नसल्याने २०२३ – २४ चा अर्थसंकल्प हा केवळ प्रशासनस्तरावर सादर केला जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प तयार करताना माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, एनजीओ आणि विविध विभागातील संघटनांच्या विभागवार सूचना, अभिप्रायाचाही विचार करण्यात यावा. तसेच सदर अर्थसंकल्प मुंबईतील सामान्य नागरिकांना अवगत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर एक नवीन पोर्टल तयार करून त्यामध्ये २०२३ २०२४ या अर्थसंकल्पाची माहिती देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाने केली होती. याबाबत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रही पाठवले होते. ही मागणी मान्य करीत प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या आहेत.

हेही वाचा >>> मीटरमध्ये बदल करा, अन्यथा दंडात्मक कारवाई ; १६ जानेवारीपासून एक हजार रिक्षा-टॅक्सी चालकांना दंड

सध्या २०२३-२४ या वर्षासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्न व खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेला अर्थसंकल्पीय अंदाज ५ फेब्रुवारी, २०२३ पूर्वी सादर करावे लागतात. त्यामुळे २८ जानेवारीपर्यंत नागरिकांना आपल्या सूचना सादर करता येणार आहेत.

येथे सूचना पाठवाव्यात अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने नागरिकांनी २८ जानेवारी २०२३ पर्यंत सूचना पाठवाव्यात. या सूचना bmcbudget.suggestion@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. तसेच ज्या नागरिकांना लेखी सूचना पाठवावयाच्या असतील त्यांनी त्या २८ जानेवारी, २०२३ पर्यंत प्रमुख लेखापाल (वित्त) यांचे कार्यालय, चौथा मजला, विस्तारीत इमारत, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महानगरपालिका मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ या पत्त्यावर पाठवाव्यात.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc appeal mumbaikars to send written suggestions for upcoming budget of mumbai municipal corporation mumbai print news zws
First published on: 18-01-2023 at 21:18 IST