सुमारे ३० हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाची मांडणी करणारे पालिका प्रशासन शहराच्या विकासासाठी पैसे खर्च करण्यात मात्र अपयशी ठरत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास आता केवण् तीन महिने उरले असताना तरतुदीपैकी केवळ २० ते २५ टक्के खर्च करण्यात आला आहे. रुग्णालये, रस्ते, मलनिसारण विभाग या महत्त्वाच्या बाबतीतही प्रशासनाने खर्चासाठी हात आखडता घेतला आहे.
रस्ता व वाहतूक विभागासाठी या आर्थिक वर्षांत तब्बल २३०९ कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली होती. मात्र मुंबईकरांना गुळगुळीत रस्त्यांची स्वप्ने दाखवणाऱ्या पालिकेने आतापर्यंत केवळ ८३८ कोटी रुपयांचीच कामे केली आहेत. रुग्णालये व आरोग्यासाठी तब्बल ७ हजार कोटी रुपयांची तरतूद असताना त्यापैकी केवळ २० टक्केच रक्कम वापरली गेली. घनकचरा व मलनिसारण विभागासाठीही दहा ते पंधरा टक्केच खर्च झाला आहे. मुंबई शहरातील आपत्कालीन व्यवस्थेसाठी पालिकेने तरतूद केलेला साडेसहा कोटी रुपयांचा निधीही तसाच पडला  आहे.  
पालिकेकडून दरवर्षी अनेक प्रकल्प, योजनांसाठी शेकडो कोटी रुपये राखून ठेवले जातात. मात्र त्यापैकी पन्नास टक्केही खर्च केले जात नाहीत. केवळ अर्थसंकल्प फुगवून दाखवण्यासाठी प्रशासनाकडून मोठे आकडे वापरले जातात, मात्र प्रत्यक्षात मुंबईकरांच्या हाती काहीही येत नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc budget only 25 percent spent
First published on: 19-12-2014 at 07:57 IST