महापालिकेला २४ लहान भूखंडांच्या बदल्यात भुलेश्वर, मांडवीमध्ये जागा

मुंबई : मुंबईमधील पहिला आदर्श समूह प्रकल्प अशी ओळख बनलेल्या भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या २४ भूखंडांचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून या २४ लहान भूखंडांच्या बदल्यात विकासकाकडून पालिकेला भुलेश्वर आणि मांडवी परिसरात पर्यायी जागा आणि फरक म्हणून २१ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला सुधार समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. परिणामी गेली सात वर्षे रखडलेल्या या २४ भूखंडांच्या हस्तांतराचा मार्ग मोकळा झाला असून भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला गती मिळणार आहे.

मोडकळीस आलेल्या इमारती, लहान गल्ल्या, परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहक आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी असे चित्र भेंडीबाजार परिसरात आहे. सैफी बुऱ्हानी अप्लिपमेंट ट्रस्टने भेंडीबाजरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. या परिसरात पालिकेचे छोटे २४ भूखंड असून त्यावरील इमारतींमध्ये ४२४ रहिवासी वास्तव्यास आहेत. पुनर्विकास प्रकल्पासाठी हे २४ भूखंड मिळावे यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील होते. आता ट्रस्टने या भूखंडांच्या बदल्यात भुलेश्वर आणि मांडवी येथे पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. मूळ भूखंडांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही पर्यायी जागा आहे. या पर्यायी भूखंडांवर इमारती उभ्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. सुधार समिती सदस्यांनी या पर्यायी जागेची पाहणी केली. अखेर सुधार समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, अशी माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.  या २४ भूखंडांच्या बदल्यात पालिकेला पर्यायी जागा देण्यात येत असल्यामुळे भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पाच्या पुढील टप्प्याला वेग मिळू शकेल.

कुठे जागा मिळणार?

पुनर्विकास प्रकल्पात जाणाऱ्या भेंडीबाजार परिसरातील भूखंडांच्या बदल्यात पालिकेला मांडवी येथील बाबुला टँक रोड येथे ४,०९७ चौरस मीटर जागा मिळणार आहे. या भूखंडावरील इमारतीत सध्या १३७ निवासी सदनिका, तर ८३ अनिवासी गाळे आहेत. त्याचबरोबर पालिकेला भुलेश्वर येथील मौलाना आझाद मार्ग येथे ४४७.७० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. येथे सध्या १५४ निवासी सदनिका, तर ५० अनिवासी गाळे आहेत. भविष्यात या इमारतींचाही पुनर्विकास मार्गी लागणार आहे.