मुंबई : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी कचरामुक्त, प्रदूषणमुक्त आणि गतिमान मुंबईचा संकल्प सोडला. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर आयुक्तांनी महानगरपालिकेच्या विविध खात्यांच्या कारभाराचा आढावा घेतला आणि महानगरपालिकेच्या एकूणच कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.
मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी महापौरांऐवजी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, संजय कुमार, सह आयुक्त, उपायुक्त, संचालक, खातेप्रमुख, सहाय्यक आयुक्त यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातील सर फिरोजशहा मेहता यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आयुक्तांनी अभिवादन केले. त्यानंतर चहल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आयुक्तांनी मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविल्याबद्दल चहल यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच नागरिकांनी सर्व स्तरावर सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित असून मतदानाचा हक्क बजाविणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक भारतीयाने मतदारयादीमध्ये आपल्या नावाची नोंदणी करून भारतीय लोकशाहीने दिलेला मतदानाचा अमूल्य अधिकार बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पाणीपुरवठा, शिक्षण, घन कचरा व्यवस्थापन, रस्ते आदी विविध खात्यांनी हाती घेतलेल्या आणि भविष्यात मुहूर्तमेढ रोवण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पांची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याची नितांत आवश्यकता असून, वृक्षांच्या संवर्धनासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ‘वृक्ष दत्तक योजने’ची अंमलबजावणी करावी, अशी सूचना आयुक्तांनी यावेळी केली. तसेच घरगुती, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणाचा समतोल राखावा, असे आवाहन चहल यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून नागरिकांना केले.