मुंबई : कूपर रुग्णालयामधील अस्वच्छता व उंदराने रुग्णांना चावा घेतल्याच्या घटनेची दखल घेत गुरूवारी मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद उघाडे यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच त्याचे कंत्राट संपेपर्यंत सेवा कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेत या कंत्राटदाराला पाठीशी घातले आहे.

रुग्णालयामधील अस्वच्छता व वाढत्या उंदरांच्या सुळसुळाटामुळे कंत्राटदारावर निविदेतील नियमांनुसार दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र त्यासंदर्भातील कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे यांनी गुरूवारी सकाळी कूपर रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील सुविधा, अस्वच्छता, उंदरांचा सुळसुळाट याबाबत पाहणी केली. तसेच रुग्णालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच या प्रकाराला आळा घालण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले.

तसेच रुग्णालयामध्ये साफसफाईचे कंत्राट दिलेल्या मे. के. एच. एफ. एम हॉस्पिटॅलिटी व फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या कंत्राटदारालाही यावेळी बोलविण्यात आले होते. या कंत्राटदाराचा ढिसाळपणा, गलथान कारभाराप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याबरोबरच दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याचे कंत्राट मुदतअखेरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

कामामध्ये कुचराई करणाऱ्या या कंत्राटदाला कूपर रुग्णालयाचे अकार्यकारी अधिष्ठात्यांनी वारंवार कारणे दाखवा नोटीस बजावून त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबतचा प्रस्ताव १२ जून २०२५ रोजी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालक डॉ. नीलम अंद्राडे आणि उपायुक्त शरद उघाडे यांच्याकडे पाठविला होता. त्याचवेळी या कंत्राटदारावर कारवाई केली असती तर ही परिस्थिती उद््भवली नसती. तसेच आता कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्याच्यावर कारवाईचा दिखाऊपणा करत उघाडे यांनी कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कूपर रुग्णालयातील प्रशासकीय कामकाज, तसेच इतर बाबींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाने तीन वरिष्ठ सदस्य असणारी पर्यवेक्षकीय समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये, सार्वजनिक आरोग्य उपायुक्त शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. नीलम अंद्राडे, रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांचा समावेश आहे. या समितीमार्फत रुग्णालयातील परिस्थितीवर सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे. समितीचे तीनही सदस्य वैयक्तिक पाठपुरावा करून प्रशासकीय कारणांमुळे उद््भवलेल्या समस्या दूर करीत आहेत.