मुंबई:  आफ्रिकेव्यतिरिक्त अन्य जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांच्या गृहविलगीकरणावर आता पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष लक्ष ठेवणार असून नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. या प्रवाशांच्या गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली पालिकेने शनिवारी जाहीर केली आहे.

केंद्र आणि राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आफ्रिकेव्यतिरिक्त ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत त्या जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांचे सात दिवस गृहविलगीकरण करणे बंधनकारक केले आहे. या प्रवाशांचे गृहविलगीकरण काटेकोरपणे केले जावे आणि संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी आता पालिकेने करोना नियंत्रण कक्ष सज्ज केले आहेत.

दिवसातून पाच वेळा संपर्काद्वारे खात्री

करोना नियंत्रण कक्षाने प्रत्येक प्रवाशाला दिवसातून पाच वेळा फोन करून गृहविलगीकरण योग्यरीतीने केले जात आहे का, याची खात्री करावी. तसेच प्रवाशाच्या आरोग्याबाबतची माहिती घ्यावी, असे यात नमूद केले आहे.

प्रवाशाने गृहविलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात आल्यास हा कक्ष संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती कळवेल. अशा प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पाठविले जाईल.

अन्य देशातील प्रवाशांना मार्गदर्शन

जोखमीव्यतिरिक्त अन्य देशांतून आलेल्या प्रवाशांच्या शंकाचे निरसन नियंत्रण कक्षाद्वारे केले जाईल आणि  आवश्यक ती मदत केली जाईल.

या सूचनांचे पालन करण्यासाठी नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याची खात्री करावी, आवश्यकता असल्यास ते उपलब्ध करून द्यावे,  अशा सूचना साहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक कक्षाला १० रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथक उपलब्ध केले जाईल. 

वैद्यकीय अधिकारी प्रवाशांच्या घरी भेट देणार

विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या घरी भेट देऊन सात दिवस गृहविलगीकरण, करोना प्रतिबंधात्मक नियम याबाबत माहिती द्यावी. तसेच सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली आहे का याची खात्री करावी आणि प्रवाशाला लक्षणे असल्यास आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करावे, असे आदेश पालिकेने दिले आहेत.

गृहनिर्माण संकुलास सूचना

प्रवासी गृहविलगीकरणात असल्याच्या सूचना संबंधित गृहनिर्माण संकुलालाही दिल्या जातील. तसेच विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे का याची माहिती संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना कळविणे संकुलांना बंधनकारक असेल. तसेच त्या घरामध्ये बाहेरील कोणतीही व्यक्ती भेट देणार नाही याबाबतही सतर्कता बाळगण्याच्या सूचना संकुलाला दिल्या जातील, असे यात नमूद करण्यात आले आहे. प्रवासी गृहविलगीकरण नियमांचे नीट पालन करत आहेत याची खात्री करण्यासाठी दरदिवशी वैद्यकीय पथकाद्वारे तपासणी केली जाईल. विलगीकरणाच्या सातव्या दिवशी प्रवाशाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. प्रवाशाने स्वत:हून करून घेता येईल किंवा पालिकेद्वारे केली जाईल.

मुंबईत नवे २२८ रुग्ण

मुंबई: मुंबईत शनिवारी करोनाच्या २१९ नवीन  बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण करोना  रुग्णांची संख्या  ७ लाख ६३ हजार ६२२ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.   शनिवारी ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६ हजार ३४८ वर पोहोचली आहे. मुंबईत  एक हजार ७९७ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

ठाणे जिल्ह्यात  नवे ९७ बाधित

ठाणे जिल्ह्यात शनिवारी नवे ९७ करोना रुग्ण आढळून आले तर, एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ९७ करोना रुग्णांपैकी ठाणे ३१, नवी मुंबई २८, कल्याण-डोंबिवली १६, ठाणे ग्रामीण १६, मीरा-भाईंदर, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले.