मुंबई : गेल्या सहा वर्षांमध्ये मुंबईत अतिवृष्टीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. मुंबईत २०१४ ते २०१८ या काळात जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला, त्या दिवशीचा दैनंदिन सरासरी पाऊस सुमारे १३१ मिमी इतका होता. मात्र, २०१९ ते २०२४ या काळात सरासरी १८२ मिमी पावसाची नोंद झाली, तर २५ जुलै २०२४ रोजी मुंबईत २६७ मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत ही सर्वाधिक एकदिवसीय पावसाची घटना ठरली आहे. परिणामी, मुंबईत पाणी तुंबण्याच्या घटना कमी व्हाव्यात, यासाठी महापालिकेने नाल्यांची वाहन क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्य जलमापक यंत्रणेद्वारे (एडब्ल्यूएस) नोंदलेल्या पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण करून संबंधित आकडेवारी संकलित करण्यात आली आहे. मुंबईत २६ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने हा अभ्यास केला आहे. गेल्या १० वर्षांत २८ वेळा अवघ्या चार तासांतच अतिवृष्टी झाली होती. त्यावरूनच मुंबईत दैनंदिन पावसाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले असून दरवर्षी पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत सुमारे ३,८०० किमी लांबीचे विस्तृत जलनिःसरण जाळे आहे. यामध्ये १.५ मीटरहून अधिक रुंद २६१.५२ किमी लांबीच्या मुख्य नाल्यांचा आणि १.५ मीटरहून कमी रुंद असलेल्या ४११.५६ किमी लांबीच्या छोट्या नाल्यांचा समावेश आहे. वाढत्या पावसामुळे मुंबईत दरवर्षी पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील नाल्यांची वहन क्षमता वाढवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

सद्यस्थितीत मुंबईतील नाल्यांची ताशी केवळ ५५ मिमी पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याची क्षमता वाढवून १२० मिमी / तास करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. मुसळधार पाऊस कोसळताना पाण्याचा सहज निचरा होण्यास मदत होईल आणि पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मुंबईत २ जुलै २०१९ रोजी २२६ मिमी, ५ ऑगस्ट २०२० रोजी १९१ मिमी, १७ जुलै २०२१ रोजी १६२ मिमी, ३० जून २०२२ आणि २७ जुलै २०२३ रोजी प्रत्येकी १३२ मिमी पावसाची नोंद झाली होती.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत दरवर्षी सरासरी १६ दिवस १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद होत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये २१ दिवस, २०२१ मध्ये १८ दिवस आणि २०२० मध्ये १५ दिवस १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१७ मध्ये २६ दिवस, २०१६ मध्ये १९ दिवस, तर २०१४ आणि २०१५ मध्ये अनुक्रमे १० आणि ११ दिवस १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.