मुंबई : मुंबईतील रस्त्यांची आता दिवसातून दोनवेळा स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या कामाचे फेरनियोजन करुन ही सेवा पुरविण्यात येणार आहे. कचरा संकलन आणि त्याचे परिवहन करण्यासाठी मुंबई महापालिका आता सर्व विभागांसाठी कंत्राटदार नेमणार आहे. त्यामुळे कचऱ्याच्या गाड्यांवरील मोटर लोडर यांना मुंबईची दोन वेळा स्वच्छता करण्याच्या कामासाठी वापरले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.
मुंबई शहर आणि उपनगरांतील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कामांचे फेरनियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत माहिती देताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या, मुंबई महानगरात दररोज सुमारे ७२०० ते ७३०० टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलित करून पुढील प्रक्रियेसाठी क्षेपणभूमीमध्ये नेला जातो. त्यासाठी रोज सुमारे १ हजार ३३४ वाहने वापरली जातात.
काही वाहने महानगरपालिकेच्या मालकीची तर काही कंत्राटदारांमार्फत नेमण्यात आली आहेत. कंत्राटदारांच्या वाहनांवर काही ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कामगार असलेले मोटर लोडर काम करतात. मात्र यापुढे संपूर्ण मुंबईत कचरा उचलण्यासाठी, कचरा संकलन करुन वाहून नेण्यासाठी लागणारी यंत्रणा कंत्राटदारांची वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कचरा गाड्यांवरील मोटर लोडरना रस्त्यांच्या स्वच्छतेचे काम दिले जाणार आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांची यापुढे दोनदा स्वच्छता केली जाणार असून दुसऱ्या पाळीतील स्वच्छतेचे काम या मोटर लोडरना दिले जाणार आहे.
महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीची कचरा वाहने, वाहन चालक आणि अन्य तांत्रिक कर्मचारी आदी यंत्रणा केवळ एकाच परिमंडळापुरती मर्यादीत असल्यामुळे इतर परिमंडळांसाठी कंत्राटदार नेमणे गरजेचे आहे. इतर सर्व प्रशासकीय विभागांमध्ये सेवाधारीत कंत्राट प्रस्तावित केले आहे. या योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाधित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. तसेच, महानगरपालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाही.- डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर)
मुंबईत आतापर्यंत कचरा संकलनासाठी दोन पद्धती वापरल्या जात होत्या. त्यात सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राटामध्ये कचरा संकलन करुन वाहून नेण्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा कंत्राटदारांची असते. तर, कार्याधारित (हायरिंग बेस्ड) कंत्राटामध्ये केवळ वाहनेच कंत्राटदारांची असतात आणि इतर सर्व यंत्रणा महानगरपालिकेची असते. त्यामुळे, एकाच कामासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कार्यरत असल्याने त्यांच्यात समन्वय साधून नागरिकांना उत्तम सेवा देणे जिकरीचे ठरते. याशिवाय, भाडेतत्वाधारीत (हायरिंग बेस्ड) कंत्राटाच्या तुलनेत सेवाधारीत (सर्व्हिस बेस्ड) कंत्राटात सुमारे २५ टक्के कमी खर्च येत असल्याने आर्थिकदृष्ट्या ही सेवा परवडणारी आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत आता सेवाधारीत कंत्राटाने कचरा संकलन केले जाणार आहे.
कचरा गाड्यांची नवीन रंगसंगती
या नव्या पद्धतीत कचरा संकलन आणि परिवहनासाठी एकच यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असून कचरा संकलनासाठी विशेष प्रकारच्या, जास्त वहन क्षमता असलेल्या व अधिक दर्जेदार तसेच आकर्षक रंगसंगतीयुक्त वाहनांचा वापर केला जाणार आहे. एकूण वाहनांपैकी सुमारे १० ते १५ टक्के वाहने विद्युत स्वरुपाची असणार आहेत. तसेच, कचरा उचलणे, कचरा पेट्यांची निगा, परिरक्षण, परिवहन आदी कामांसाठी एकच यंत्रणा कार्यरत राहणार आहे. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कॉल सेंटर कार्यान्वित केले जाणार असल्याचे डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले आहे.
मोटर लोडर कामगारांची दुसऱ्या पाळीत रस्ते स्वच्छतेसाठी नेमणूक
मुंबईमध्ये असलेल्या सुमारे २ हजार ८०० किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची दिवसातून दोनवेळा स्वच्छता (सेकंड स्विपिंग) करण्याचे महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केले आहे. त्या कामासाठी अनुभवी मनुष्यबळाची गरज असल्याने महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचेही प्रस्तावित आहे. मोटर लोडर कामगारांना या कामासाठी ते सध्या कार्यरत असलेल्या प्रशासकीय विभागातच नेमण्यात येणार आहे.