– संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई: एका खोलीत चार ते सहाजणांना राहावे लागते. आमच्या निवासाची म्हणजे वसतिगृहातील खोल्यांची अवस्था दयनीय म्हणावी अशी आहे. भिंतीवर रंगाचा पत्ता नाही की झोपायला चांगली व्यवस्था नाही. स्वच्छतागृहाला ‘स्वच्छतागृह‘ का म्हणावे असा प्रश्नच पडावा. वाय-फायचा पत्ता नाही. आम्हीच आमची व्यवस्था करतो. दिवस-रात्र रुग्णसेवा केल्यानंतर खोलीवर यावे तर वातावरण ना अभ्यासासाठी पोषक ना झोपही धड लागू शकते… ही खंत मुंबई महापालिकेच्या सर्वच वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये राहणाऱ्या निवासी डॉक्टरांची… निवासी डॉक्टरांची ही व्यथा पालिका प्रशासनाने लक्षात घेतली असून या परिस्थितीत लवकरच संपूर्ण बदल होणार आहे. वैद्यकीय विद्यार्थी राहत असलेली वसतिगृहे नुसती चकाचक होणार नाहीत तर त्याला अत्याधुनिकतेचा साजही चढविला जाणार आहे.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

महापालिकेच्या केईएम, शीव, नायर, नायर दंत तसेच कुपर, राजावाडी आदी ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयात मिळून सुमारे साडेचार हजार निवासी डॉक्टर असून त्यांची राहण्याची व्यवस्था ही कोंडवाड्यासारखी असल्याचे या निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. ११० चौरस फुटाच्या खोलीत जिथे दोन डॉक्टर राहणे अपेक्षित आहे, तेथे तीन ते चार लोकांना नाईलाजाने राहावे लागत आहे. काही खोल्यांमध्ये ज्या थोड्या मोठ्या आहेत तेथे सहा लोक राहातात. निवासी डॉक्टरांच्या अनेक इमारती जुन्या असून त्यांची अवस्था दयनीय म्हणावी लागेल. कुठे फरशा उखडलेल्या तर कुठे भिंतीवरचा रंग उडालेला… काही ठिकाणी स्वच्छतागृहांना ‘स्वच्छतागृह‘ का म्हणावे असा प्रश्न पडावा अशी अवस्था असल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महापालिका मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांच्या राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगली व्यवस्था करण्याची मागणी यापूर्वी आम्ही पालिका प्रशासनाकडे केली आहे. साधारणपणे सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या राहण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. छोट्याशा जागेत तीन ते सहा डॉक्टरांना राहावे लागते. परिणामी राहण्याच्या ठिकाणी अभ्यास करणे कठीण होते. झोपण्यापासून अनेक अडचणी आहेत. या परिस्थितीत युद्ध पातळीवर बदल होणे आवश्यक आहे. या परिस्थितीचा आमच्या अभ्यासावर तसेच रुग्णसेवेवर परिणाम होऊ न देणे याची काळजी प्रशासनाने घेणे अपेक्षित असल्याचे या निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीवकुमार यांनी, नेमक्या याच समस्येला हात घालत वैद्यकीय विद्यार्थ्यांची निवासस्थाने केवळ राहण्यायोग्य नाही तर सर्व सोयींनी युक्त असतील याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत डॉ. संजीवकुमार यांना विचारले असता ते म्हणाले, दोन टप्प्यात आम्ही वैद्यकीय विद्यर्थ्यांच्या वसतीगृहामधील व्यवस्थेत बदल करणार आहोत. यासाठी एक स्वतंत्र एजन्सी नेमून या एजन्सीला स्वच्छता, खोलीची रंगरंगोटीपासून वायफाय व्यवस्थेसह सर्व गोष्टींची जबाबदारी दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कुपर, राजावाडी व नायर रुग्णालयातील डॉक्टरांची निवसस्थाने व्यवस्थित केली जातील. याठिकाणी त्यांना अत्यावश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एका फोन किंवा मेसेजवर त्यांच्या अडचणी सोडविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमून त्यांच्या माध्यमातून निवासी डॉक्टरांना राहण्याच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई पालिकेची ‘कॅग’कडून चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुढील आठवड्यात याबाबतच्या निविदा जाहीर होणार आहेत. निवासी डॉक्टर हे मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. ताकद आहे. करोना काळात या डॉक्टरांनी केलेले काम कोणालाही विसरता येणार येणार नाही, असेही डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. या डॉक्टरांसाठी अत्याधुनिक जीम, वायफाय, ई-लायब्ररी तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था दिली जाईल. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना कोणत्या अधिकच्या कोणत्या व्यवस्था हव्या आहेत याबाबत मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेशी चर्चा केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात केईएम, सायन आदी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवास्थानांची व्यवस्था केली जाईल. तसेच काही नवीन इमारती बांधण्याचे कामही हाती घेण्यात येणार असून या डॉक्टरांना अभ्यास व कामाचा ताण त्यांच्या निवास्थानी गेल्यावर जाणवणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.