मुंबईसह राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदा तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांमध्ये मंगळवारी, २१ फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचा आदेश कामगार आयुक्तांनी संबंधित आस्थापनांना दिला आहे. तसेच कामगारांना सुट्टी न देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्यात २१ फेब्रुवारी रोजी बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, िपपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती  व नागपूर या दहा महापालिकांमध्ये मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या तसेच गडचिरोली जिल्हा परिषदे अंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा  या आठ पंचायत समित्यांमध्येही मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना भरपगारी सुट्टी अथवा कामाच्या तासामधून मतदान करण्याकरिता दोन तासांची सवलत देण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मतदानाच्या दिवशी विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉिपग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्तांनी दिले आहेत. कामगारांच्या अनुपस्थितीमुळे नुकसान होईल अशा आस्थापनेतील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात यावी असेही या पत्रकात म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc elections 2017
First published on: 19-02-2017 at 00:42 IST