मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा ऑगस्ट महिन्यात जाहीर झाला असून त्यावर आलेल्या हरकती व सूचनांवर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली. महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत सुनावणी घेतली जात आहे. या प्रारुप आराखड्यावर ४९२ हरकती व सूचना आल्या असून त्यापैकी पश्चिम उपनगरातील १८९ तक्रारींची सुनावणी बुधवारी पार पडली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी उपस्थित होते.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महापालिकेने आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारुप आराखडा २२ ऑगस्ट रोजी जाहीर केला. या प्रारुप आराखड्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
मुदतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत मुंबई महापालिकेकडे ४८८ हरकती व सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या ४८८ हरकती व सूचनांवर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात ही सुनावणी पार पडली. १० ते १२ सप्टेंबर असे तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्यामार्फत सुनावणी घेतली जाणार आहे.
मुंबई महापालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली. तेव्हापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. गेली तीन वर्षे विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार या निवडणुकीच्या घोषणेकडे लक्ष लावून बसले होते. प्रभाग पुनर्रचनेचा प्रारुप आराखडा जाहीर झाल्यामुळे एक प्रकारे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबईत २२७ प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीच्या वेळी जशी प्रभाग रचना होती, त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत. तरीही हरकती व सूचना सादर झाल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित केले आहेत. त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावावरील प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेतली जात आहे. मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग या ठिकाणी १०, ११ आणि १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० दरम्यान सुनावणी होणार आहे. दरम्यान, या तीन दिवसांत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शहर या विभागांप्रमाणे सुनावणी होणार आहे.
पश्चिम उपनगरातील तक्रारींवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी वांद्रे परिसरातील प्रभाग क्रमाग ९६ मधील ४८ कुटुुंबांना वांद्रे पश्चिम प्रभाग क्रमांक १०० मध्ये समाविष्ट केल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आले. स्थानिक रहिवासी शम्स खान यांनी याबाबत तक्रार केली आहे. रेल्वे मार्गाच्या एका बाजूला असलेल्या नागरिकांना रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या बाजूच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले आहे. हा बदल वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच वांद्रे येथील खेरवाडी परिसरातील खाटीकवाडी विभागामधील जवळपास १४०० रहिवाशांनीही आपल्या विभागातील प्रभाग सीमारेषांना विरोध केला आहे. या परिसरातील एक चाळ दुसऱ्या प्रभागात दाखवण्यात आली आहे. त्याला रहिवाशांनी विरोध केला असून या परिसरातील एकूण १०० रहिवाशांनी तक्रार केली होती. हे सगळे रहिवासी यावेळी सुनावणीला आले होते. तर वांद्रे येथील प्रभाग क्रमांक १०२ च्या माजी नगरसेविका मुमताज खान यांनीही प्रभाग रचनेला आक्षेप घेतला असून आपल्या विभागातील मतदारांची संख्या कमी करण्यासाठी प्रभागांचा आकार कमी करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.