मुंबई : एल.एस.जी.डी. आणि एल.जी.एस. हे प्रशासकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महापालिकेतील लिपिकीय व निरीक्षकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतनवाढ बंद करण्यात आली असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महापालिका प्रशासनाने हा बेकायदेशीर निर्णय रद्द करावा, तसेच जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, या मागणीसाठी येत्या ८ ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

एल.एस.जी.डी. आणि एल.जी.एस. हे प्रशासकीय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या मुंबई महापालिकेतील लिपिकीय व निरीक्षकीय संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना १९६७ पासून विशेष वेतनवाढ देण्यात येत होती. ही वेतनवाढ वर्षानुवर्षे त्यांच्या सेवाशर्तीनुसार देण्यात येत होती. मात्र, महापालिका प्रशासनाने ५ जानेवारी रोजी परिपत्रक काढून संबंधितांची वेतनवाढ बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय बेकायदेशीर आणि एकतर्फी असल्याचा आरोप द म्युनिसिपल युनियनने केला आहे.

हा निर्णय मागे घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, महापालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेण्यात येणार असून या भेटीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. महापालिकेत ५ मे २००८ पासून नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्नही प्रलंबित आहे.

दरम्यानच्या काळात उपदान, जुन्या पेन्शनचा भाग असलेला कुटुंब निवृत्ती वेतन आणि असमर्थता निवृत्ती वेतन लागू करून घेण्यात यश आले होते. असे असले तरीही जुन्या पेन्शन योजनेतील सेवानिवृत्ती वेतनाचा भाग अद्यापही लागू झालेला नसल्याने कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.