मुंबई : ‘कार्यकारी सहाय्यक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी महानगरपालिकेकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तात्पुरत्या प्रवर्गनिहाय निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी तसेच नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी १ ऑगस्टपर्यंत उपस्थित राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
या कालावधीदरम्यान अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे पुन्हा १४ ऑगस्टपर्यंत कागदपत्रे पडताळणी आणि नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी अंतिम संधी देण्यात आली आहे. या अंतिम संधी कालावधीदरम्यानही अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना ‘कार्यकारी सहाय्यक’ पदासाठी स्वारस्य नसल्याचे गृहित धरुन त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात येणार आहे.
महानगरपालिकेतील ‘कार्यकारी सहाय्यक’ या संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी उमेदवारांची तात्पुरती सामाईक निवड यादी तयार करण्यात आली होती. तसेच, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया मे २०२५ मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी पुन्हा संधी देण्यात आली.
त्यानुसार, महानगरपालिकेतर्फे तात्पुरत्या प्रवर्गनिहाय निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी पुढील कार्यवाहीसाठी १ ऑगस्टपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, या कालावधीतही वाढ करण्यात आली असून उमेदवारांना १४ ऑगस्टपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
संबंधित उमेदवारांनी १४ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत महापालिका मुख्यालयातील ‘प्रमुख कर्मचारी अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे. या कालावधीत अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या ‘कार्यकारी सहायक’ पदाकरिता स्वारस्य नसल्याचे गृहित धरुन त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तात्पुरती निवड यादी, कागदपत्रे पडताळणीसंबंधी सूचना तसेच संबंधित भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी अद्ययावत माहिती व सूचना उमेदवारांनी संकेतस्थळावरून मिळवावी, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.