मुंबई : वड, पिंपळ, कृष्णवड अशा देशी प्रजाती वाचवण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याकरिता पालिकेच्या उद्यान विभागाने या झाडांची लहानलहान रोपे तयार केली आहेत. गुटी कलम या पद्धतीचा वापर करून हजारो रोपे तयार करण्यात आली असून ही रोपे संपूर्ण मुंबईतील उद्यानांमध्ये लावण्यात येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याच्या विविध विभागातील रोपवाटिकेत विविध प्रकारच्या देशी वृक्षांची रोपे तयार करण्यात येतात.
हेही वाचा : “‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे एक…”; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
त्यात प्रामुख्याने वड, कृष्णवड, कुंती, लिंबूवर्गीय झाडांची रोपे, तसेच इतर दीर्घायुषी देशी प्रजातींची हजारो रोपे तयार करण्याचे काम उद्यान विभागामार्फत केले जाते. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक असलेल्या गुटी कलम पद्धतीने उद्यान विभागाने हजारो कलमे तयार केली आहेत. सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर यापध्दतीचा वापर करून मुलुंड मधील टी विभागातील उद्यान कर्मचाऱ्यांनी वडाच्या झाडाची १००० पेक्षा अधिक रोपे तयार केली. त्यानंतर त्याच पद्धतीचा वापर करून उद्यान खात्याच्या विविध विभागांमध्ये या पद्धतीने दोन महिन्याच्या कालावधीतच ८ ते १० फूट उंचीची हजारो रोपे तयार करण्यात आली आहेत.
