मुंबई : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचाव करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने ‘रेबिजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने, महानगरपालिका आणि विविध प्राणी कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील भटक्या श्वानांसाठी १ सप्टेंबर २०१५ ते १५ मार्च २०२६ दरम्यान सामूहिक रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राण्यांच्या कल्याणासाठी व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तसेच युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटीसोबत महानगरपालिकेने १ सप्टेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम हाती घेतली आहे.

भटक्या श्वानांचे व्यापक प्रमाणात लसीकरण करून रेबीजपासून होणाऱ्या मानवी मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्राणी कल्याण करणे आणि समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली. स्थानिक रहिवासी, कल्याणकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, प्राण्यांना खाऊ घालणारे व प्राणी सेवक यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच, लसीकरणासाठी येणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांना परिसरात प्रवेश देणे व भटक्या श्वानांची ओळख पटवून देणे आदी कार्यवाहीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.