२८ फेब्रुवारी रोजी केवळ अर्धा तास सुनावणी; १४० झाडांवर कुऱ्हाड, तर ४६० झाडांचे पुनरेपण
मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा महामार्गासाठी तब्बल ६०० झाडांवर संक्रांत ओढवणार आहे. यापैकी १४० झाडे कापावी लागणार असून ४६० झाडांचे पुनरेपण करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात येत्या २८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीसाठी केवळ अध्र्या तासाची वेळ ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आरेतील मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे तोडल्याच्या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तास्थानी आहे. असे असताना किनारी मार्गासाठी होणाऱ्या या वृक्षतोडीबाबत शिवसेनेची भूमिका काय असेल, याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा महामार्गासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यानची ६०० झाडे हटवावी लागणार आहेत. भुलाबाई देसाई मार्गावर पालिकेने तशा नोटिसा लावल्या आहेत.
पालिकेच्या उद्यान विभागाने याबाबतची नोटीस १७ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली असून नागरिकांचे आक्षेप किंवा सूचना असल्यास सात दिवसांत जिजामाता उद्यानातील उद्यान अधीक्षक यांच्या कार्यालयात लेखी देण्याबाबत कळवले आहे. तसेच याप्रकरणी २८ फेब्रुवारीला उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात दुपारी अडीच वाजता सुनावणी होणार असून त्यासाठी केवळ अर्धा तास देण्यात आला आहे. ६०० झाडे विस्थापित अथवा नामशेष होणार असताना त्याबद्दलच्या सुनावणीसाठी केवळ अर्धा तास देण्यात आल्याबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे.
प्रस्ताव काय?
- प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शिनी पार्क येथील ३१ झाडे कापणार. १२७ झाडांचे पुनरेपण.
- भुलाबाई देसाई मार्ग ते टाटा गार्डन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ६१ झाडांची कापणी. ७९ झाडांचे पुनरेपण.
- हाजी अली ते लोटस जंक्शन येथील ३८ झाडे तोडणार. ४९ झाडांचे पुनरेपण. वरळीतील १० झाडे तोडणार. २०५ झाडांचे पुनरेपण.
असाही विरोधाभास
सागरी महामार्गामुळे इंधन बचत होऊन प्रदूषणात घट होईल असा दावा पालिकेतर्फे केला जात आहे. या मार्गालगत देशी विदेशी झाडे लावण्यात येणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ९० हेक्टर जागेवर भराव घालण्यात येणार असून त्यापैकी ७० हेक्टर जागेवर मनोरंजन मैदान, उद्यान, हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे. मात्र या मार्गासाठी आधीच अस्तित्वात असलेली झाडे हटवावी लागणार आहेत.