मुंबई : मुंबई महापालिकेने प्रकल्पबाधितांसाठी बांधलेली माहूल येथील घरे कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. तब्बल नऊ हजार घरांसाठी शेवटच्या मुदतीपर्यंत केवळ ३३० अर्ज आले होते. या अर्जदारांपैकी प्रत्यक्षात केवळ ५३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. त्यामुळे उर्वरित घरांच्या विक्रीचा मोठा प्रश्न पालिका प्रशासनापुढे आहे.

मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरात माहूल येथे प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधली आहेत. यापैकी काही घरांमध्ये प्रकल्पबाधित राहतात. मत्र बहुतांश घरे ही रिकामी आहेत. या घरांचा मोठा देखभाल खर्च मुंबई महापालिकेला करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने माहूल येथील १३ हजार घरांपैकी ९,०९८ घरे विक्रीला काढली आहेत. ही घरे महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कामगारांना स्वस्तात विकत देण्याचे ठरवले होते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अर्ज करण्यास मुदतवाढ देऊनही कर्मचाऱ्यांनी ही घरे घेण्यात रस दाखवलेला नाही.

या योजनेअंतर्गत एवर स्माईल पी. ए. पी. संकुल, माहूल आंबा पाडा, आणिक गाव, येथील सदनिका खरेदी तत्वावर देण्यात येणार होत्या. एक घर १२ लाख ६० हजार रुपयांत, तर दोन घरे २५ लाख २० हजार रुपयांत खरेदी करण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच म्युनिसिपल बँकेकडून ८.५० टक्के व्याज दराने ९० टक्के कर्जही देण्याचे ठरवले होते.

अर्ज करण्यासाठी दोन वेळा मुदत वाढवण्यात देण्यात आली. शिवाय निकषही शिथिल करण्यात आले. मात्र दोन महिन्यांनंतरही फक्त ३३० अर्ज आले. सोडत काढून २१ जून रोजी या घरांचे वाटप केले जाणार होते. मात्र ३३० पैकी सुमारे ५३ कर्मचाऱ्यांनीच घरांची रक्कम जमा केली. घराचे वाटप करण्य़ासाठी ३० जूनपर्यंत अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत होती. मात्र फक्त ५३ अर्जदारांनीच घरांची अनामत रक्कम भरली. त्यामुळे उर्वरित १९५ अर्जदारांनी ही घरे नाकारली. मुदत संपल्याने आता पैसै भरलेले नाहीत त्यांचा घरांसाठी विचार केला जाणार नाही. ज्या ५३ अर्जदारांनी ७२ घरांची अनामत रक्कम भरली, त्यांनाच घरांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता पालिकेच्या संबंधित विभागाने निकषात बदल करून पालिकेच्या निवृत कर्मचाऱ्यांनाही या घरांसाठी अर्ज करता येईल असा प्रस्ताव तयार केला आहे. पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वार्षिक सात कोटी रुपये देखभाल खर्च

सफाई कर्मचाऱ्यांसाठी माहूलमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या देखभालीसाठी वर्षाकाठी पालिकेला ७ कोटी रुपये खर्च येत आहे. ही घरे रिकामीच राहिली तर त्याचा मोठा आर्थिक फटका पालिकेलाच सोसावा लागणार आहे.