मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्त यांनी आदेश देऊनही रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांच्या बोनससंदर्भात आरोग्य विभागाने वेळेत प्रस्ताव सादर न केल्यामुळे २०२२–२०२३ पासून या कामगार बोनसपासून वंचित आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयातील रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी ‘बोंबाबोंब’ आंदोलन करणार आहेत.
आरोग्य विभागातील महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये २००९-२०१० पासून रोजंदारी कामगार व २०१६-२०१७ पासून बहुउद्देशीय कामगार किमान वेतनावर काम करीत आहेत. त्यांना २०२२-२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे दिवाळीसाठी पाच हजार रुपये बोनस म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री यांनी आदेश देऊनही व महापालिका आयुक्तांनी बोनस देण्याचे घोषित करूनही आरोग्य विभागाच्यावतीने वेळेत प्रस्ताव सादर न केल्यामुळे रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांना बोनसपासून वंचित रहावे लागले आहे.
त्याचप्रमाणे यंदा मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्तांनी बोनस देण्याबाबत मान्य केले. त्यानुसार महानगरपालिका उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे प्रभारी संचालक डॉ. मोहन जोशी यांना १६ ऑक्टोबर रोजी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. परंतु दिवाळी उलटूनही चालू वर्षाचा आणि यंदाचा बोनस अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व रुग्णालयामधील रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ विपिन शर्मा, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. नीलम अंद्राडे यांना दिवाळी सणासाठी बोनस देण्याबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनने पत्रव्यवहार केला होता. तसेच प्रत्यक्ष भेटूनही विनंती केली होती.
मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारे प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. प्रस्ताव सादर करण्याबाबतही चालढकल केली जात आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबररोजी दुपारी ३.३० वाजता सर्व रुग्णालयातील रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
नायर दंत रुग्णालयाच्या आवारातील संचालकांच्या कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.
