महापालिकेकडून चाचपणी; रेल्वेच्या परवानगीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष

मुंबई : दादर पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या सर्वात जुन्या टिळक पुलाची आता दुरवस्था झाली असून या पुलाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. भविष्यात या पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी तीन ठिकाणांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी दोन पर्याय तांत्रिक समितीने नाकारले आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या पर्यायासाठी पालिका चाचपणी करणार आहे. मात्र त्यासाठी पालिकेला रेल्वेच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

दादर पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या टिळक पुलावर दररोज मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सुरू असते. प्रभादेवी स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल आणि टिळक पूल या दोन पुलांवर वाहतुकीची भिस्त आहे. मात्र टिळक पूल हा अतिशय जुना असल्यामुळे कधीही दुर्घटना होऊ शकते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या पुलाचा प्लास्टरचा काही भाग हिंदू कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर कोसळला. तेव्हा या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये हा पूल तीन ठिकाणी खचला. त्यामुळे या पुलाला पर्याय शोधण्याची गरज आहे.

अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या सर्वच पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच गेल्यावर्षी हिमालय पूल पडून त्यात सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेने रेल्वेमार्गावरील पुलाची संरचनात्मक तपासणी केली. टिळक पुलाचे केवळ दृक्परीक्षण न करता सखोल संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. त्यात टिळक पुलाबाबत मोठय़ा संरचनात्मक दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. जीर्ण झालेल्या मुख्य लोखंडी भागांची संरचनात्मक दुरुस्ती करणे, सिमेंटने दगडी बांधकामांच्या भेगा भरणे, जीर्ण झालेल्या पदपथांच्या काही भागांची पुनर्बाधणी करणे व प्लास्टर करणे ही कामे हाती घेण्यात आली असून ती मे २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे पूल विभागाचे म्हणणे आहे. त्यातच रेल्वेने आयआयटीकडून जी तपासणी केली त्यात या पुलाचा पृष्ठभाग खरवडण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या संमतीनंतर हे कामही हाती घेण्यात येणार आहे. याबरोबरच टिळक पुलाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी तीन ठिकाणी दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे आणि रेल्वे मार्गावरून जाणारे पूल प्रस्तावित करण्यात आले होते. टिळक पुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पालिकेने शोधलेल्या तीन पर्यायी मार्गापैकी माटुंगा जिमखान्याकडून जाणाऱ्या प्रस्तावित पुलाचा अधिकाधिक भाग हा पश्चिम व मध्य रेल्वेच्या हद्दीतून जातो. त्यामुळे हा पर्यायी मार्ग कितपत व्यवहार्य आहे हे तपासण्यासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतरच या पुलाचे भवितव्य ठरणार आहे.

हे तीन पर्याय

टिळक पुलाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी तीन ठिकाणी दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे व रेल्वे मार्गावरून जाणारे पूल प्रस्तावित करण्यात आले होते.

१ टिळक  पुलाच्या दक्षिणेकडे एमएमजीएस मार्ग ते एम.

सी. जावळे मार्ग यांना जोडणारा पूल

२ टिळक पुलाच्या उत्तरेकडील दिशेला बाल गोविंददास मार्ग ते लखमशी नप्पु मार्ग (माटुंगा जिमखाना) यांना जोडणारा पूल

३ माटुंगा आणि शीव स्थानकांदरम्यान टी. एच. कटारिया मार्ग ते भाऊ दाजी मार्ग यांना जोडणारा सेंट्रल रेल्वे मार्गावरील पूल.

या तीन पर्यायांपैकी पहिला व तिसरा पर्याय तांत्रिक सल्लागारांनी नाकारला आहे. या ठिकाणी पूल बांधणे शक्य नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या  पर्यायासाठी पालिका चाचपणी करणार आहे.