मुंबई : भांडुप येथील भट्टीपाडा चौकातील रस्ता रूंदीकरणासाठी अडथळा ठरणाऱ्या ६४ बांधकामे मुंबई महानगरपालिकेने हटवली. भट्टीपाडा जंक्शन येथील खोत मार्ग, गावदेवी मार्ग, जंगल मंगल मार्ग आणि भट्टीपाडा मार्ग एकत्र येऊन तयार होणाऱ्या चौकासाठी ही बांधकामे अडसर ठरत होती. ही तब्बल ४० वर्षे जुनी बांधकामे हटवल्याने रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. भट्टीपाडा जंक्शन चौक रूंदीकरणामुळे टेंबीपाडा, गावदेवी, एन्थॉनी चर्च, छत्रपती शिवाजी महाराज तलाव या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. या भागातील रहिवाशांना भांडूप आणि नाहूर रेल्वे स्थानक येथे जाण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

हेही वाचा : VIDEO : “एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल

आता निष्कासन कारवाईमुळे ब्रिमस्टोवॅड प्रकल्पातील गावदेवी नाला रूंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची छाटणी देखील रितसर परवानगीने करण्यात आली आहे, अशी माहिती एस विभागाचे सहायक आयुक्त महादेव शिंदे यांनी दिली. एस विभागातील भट्टीपाडा जंक्शन येथील अरूंद रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. या चौकाच्या रूंदीकरणाचे काम एस विभागामार्फत हाती घेण्यात आले होते. ही कारवाई करण्यासाठी १ पोकलेन, ३ जेसीबी, ६ डंपर, १० अधिकारी आणि ४९ कामगार तैनात होते. तसेच भांडूप पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला होता. यामध्ये अभियंता पथकासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता.