मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या द म्युनिसिपल को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान गुरूवार, २१ ऑगस्ट रोजी होत आहे. मात्र अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे मतदान पुढे ढकलावे, अशी मागणी ‘बीएमसी सहकार पॅनल’ने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

द म्युनिसिपल को-ऑपरेटिव बँक लि’चे पात्र मतदार हे महानगरपालिकेचे कामगार व कर्मचारी आहेत. तसेच, निवडणूक व मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग असून ही मतदान प्रक्रिया सुयोग्य प्रकारे व अधिकाधिक पात्र मतदारांच्या सहभागाने होणे गरजेचे आहे. मात्र, मुसळधार पावसात सर्व मतदार मतदानासाठी पोहोचण्याची शक्यता कमी असल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. मुसळधार पावसानंतर १ ते २ दिवस महानगरपालिकेच्या कामगार व कर्मचाऱ्यांना साफसफाईचे काम करावे लागते. अशा परिस्थितीत मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी होऊन त्याचा प्रतिकूल परिणाम निवडणुकीवर होई शकते, असे मत महानगरपालिकेच्या सहकार पॅनल’ने व्यक्त केले आहे. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी होणारे मतदान पुढे ढकलावे, अशी मागणी पॅनलकडून करण्यात आली आहे.