मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता ताबा घेतला आहे. आतापर्यंत हे कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होते. नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवशेनात देखील शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यामुळे हे कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात आले होते. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच शिंदे गट आक्रमक होताना दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयावर ताबा घेण्यासाठी शिंदे गटाकडून खासदार राहूल शेवाळे, नगरसेवक शीतल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव व इतर नेते उपस्थित होते. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्वांनी बाहेर काढले.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडत भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावरुन वाद झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यानंतर ठाणे, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी स्थानिक पक्ष कार्यालय आणि शिवसेना शाखांवर हक्क सांगण्यावरुन दोन्ही गटात वाद झाले आहेत. त्यानंतर आता थेट मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयावर हक्क सांगण्यावरुन दोन्ही गटात राडा झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत सत्ता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले होते. यामध्ये अनेक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश होता. मात्र मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास नगरसेवक समाधान सरवणकर आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्याखेरीज इतर नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले नाहीत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर असताना आता शिंदे गट मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवण्यासाठी आक्रमक झालेला दिसतो.