मुंबई : रस्त्यांच्या कडेला टाकून दिलेली जुनी बेवारस वाहने जप्त करण्याची मुंबई महापालिकेची मोहीम गेल्या काही महिन्यांपासून थंडावली आहे. या वाहनांच्या विल्हेवाटीसाठी जागाच मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. माहूलमध्ये वाहनांच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेला दिलेली जागा उंचावर असल्याने त्यांचा वापर करण्यात येत नाही.

जुनी किंवा गुन्ह्यांतील अनेक वाहने रस्त्याच्या कडेला ठेवली जातात. त्यामध्ये पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होते. तसेच त्यांचा वाहतुकीलाही अडथळा होतो. त्यामुळे ती महापालिकेकडून हटवली जातात. मात्र करोनाकाळात ही जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे देण्यात आली होती. तर करोना निर्बंध हटवल्यानंतर मार्च महिन्यात ही जबाबदारी पुन्हा महापालिकेकडे आली. तेव्हापासून महापालिका आणि वाहतूक विभागाने मोठय़ा प्रमाणावर मोहीम राबवून बेवारस वाहने हटवली. आता बेवारस वाहने ठेवण्यासाठी असलेल्या बहुतांश जागांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन जागा शोधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याला ‘एसआरए’कडून प्रतिसाद मिळाला असून माहूल येथे १० हजार चौरस मीटर जागा मिळाली. मात्र ती उंचावर असल्यामुळे त्याचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. दरम्यान, या वाहनांच्या विल्हेवाटीसाठीच्या जागेसंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.