जकात कराऐवजी एलबीटी लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयप्रक्रियेतील संभ्रमामुळे महानगरपालिकेचे जकात उत्पन्न तब्बल ५४० कोटी रुपयांनी घटले आहे. निवडणूक वर्ष असल्याने पुढील वर्षांत एलबीटी लागू होणार नसल्याने जकात उत्पन्न ७८०० कोटी रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी बुधवारी पालिका अर्थसंकल्पानंतरच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. २०१३-१४ या वर्षांत पालिकेला जकात करामधून ७७४० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र एलबीटी लागू होणार असल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी अनेक दिवस दुकाने बंद ठेवली. जकात कर रद्द होण्याची शक्यता असल्याने त्याचे उद्दीष्ट गाठण्यासाठी एक्स रे यंत्र, स्कॅनिंग, अधिक कर्मचारी संख्या याबाबत निर्णय घेता आले नाही व त्यामुळे जकात उत्पन्नात घट झाली, असे कुंटे म्हणाले. मात्र पुढच्या वर्षी निवडणुकांमुळे एलबीटी लागू होणार नसल्याने जकातीचे उत्पन्न ७८०० कोटी रुपयांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे.
खासगी जागांवरही पालिकेची सफाई
शहराच्या सफाईत एकवाक्यता आणण्यासाठी एमएमआरडीएचे प्रकल्पस्थळ, रेल्वे, विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट या ठिकाणीही पालिकेने सफाई मोहीम हाती घेण्याचे ठरवले आहे. मात्र याबाबत आतापर्यंत केवळ ‘एमएमआरडीए’शीच चर्चा झाली असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी स्पष्ट केले. याशिवाय लहान प्रमाणातील डेब्रिज उचलण्याची सशुल्क ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सेवाही पालिकेने लागू केली आहे.
बिल्डरांपासून चार हात दूर
मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्त करण्यासाठी, पुनर्बाधणी करण्यासाठी या आर्थिक वर्षांत तब्बल ५४१.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र यासाठी बिल्डरांची मदत घेण्यात येणार नसून पालिका स्वतच या इमारतींचे काम करेल, तसेच मंडयांचा पुनर्विकासही पालिकेच्या आर्थिक निधीतून होणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून २५३१ कोटी येणे
राज्य शासनाच्या विविध खात्याकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर, जल व मलनि:स्सारण आकार, शासनाकडे जमा होणाऱ्या करातील महापालिकेचा हिस्सा इत्यादी पोटी नोव्हेंबर २०१३ अखेरीस पालिकेला २५३१.०२ कोटी येणे आहे. ही रक्कम वसूल कशी करायची असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे.
आणि महापौर चिडले..
आयुक्तांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या राजकीय होर्डिग्जमुक्त मुंबईला पाठिंबा देणार का, या खोचक प्रश्नाला महापौरांनी सुरुवातीला होकार भरला. शिवसेना स्वतची होर्डिग्ज काढणार का, या प्रश्नावर मात्र ते खवळले. फलक परवानगी घेऊनच लावले आहेत, असे सांगताना मात्र महापौरांचा आवाज चढला.
केवळ बजेटवर प्रश्न विचारा, असा दम भरत त्यांनी दुसऱ्या प्रश्नाकडे मोहरा वळवला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणासाठी नव्या योजनांचा अभाव
शिक्षण विभागाचा २६६०.४४ कोटी रुपयांचा २.१० कोटी रुपये शिलकीचा २०१४-१५ वर्षांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी बुधवारी शिक्षण समितीच्या बैठकीत सादर केला. ‘चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टीम’ या एकमेव नव्या योजनेची घोषणा आयुक्तांनी केली.  विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी १०० शाळांमध्ये इयत्ता आठवीचे नवे वर्ग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अद्यापही मिळू न शकलेल्या चिक्कीसाठी ८४.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बालवाडय़ांमधील शिक्षकांच्या वेतनात एक हजार रुपयाने, तर बालवाडी सेविकांच्या वेतनात ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षित मातृत्वासाठी..
खेरवाडी आणि कुल्र्याच्या बैलबाजारात प्रसुतीगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कुल्र्यातील कसाईवाडा, गोवंडीतील शिवाजी नगर, महाराष्ट्र नगर, मालाडमधील मालवणी व पठाणवाडी येथे एकूण पाच नवीन प्रसुतीगृहे उभारण्यात येतील.  देवनार, विलेपार्ले, गोरेगाव येथील प्रसुतीगृहांची पुनर्बाधणी व माहीम येथील प्रसुतीगृहाची दुरुस्ती; मरोळ, ओशिवरा, मागाठाणे, चेंबूर नाका, भांडूप येथील प्रसुतिगृहांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. विलेपार्ले, आकुर्ली रोड, बोरीवली, देवनार, मुलुंड आणि माहीम येथील प्रसुतीगृहांची दजरेन्नती करण्यात येणार आहे. यातून एकूण १३० खाटा, अतिदक्षता विभागात २५ खाटा आणि १३० ओपीडी वाढतील. डायलिसीससाठी पीपीपी तत्त्वावर माफक दरातील १०० खाटाही उपलब्ध होणार आहेत.

पाणी पुरवठा
मुंबईच्या पाणीपुरवठय़ासंबंधी माहिती केंद्राची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पाण्याच्या समस्येसाठी ग्राहक सेवा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. जलबोगद्यांसाठी ४३२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून २०१४-१५ साठी १०३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तानसा धरणातून पाणीपुरवठय़ासाठी टाकण्यात येणाऱ्या वाहिन्यांसाठी १९३ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

ठळक वैशिष्टे
* राजकीय जाहिरातींना बंदी
*  छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट भुयारी मार्गाचा पुनर्विकास
* एस. व्ही. रोड व आर. सी. मार्ग सुधारणार
* २५० शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण देणार
* शताब्दी गोवंडी, फुले रुग्णालय, एम. टी. अगरवाल रुग्णालयाचा पुनर्विकास
*  गरीब वस्त्यांमध्ये १५ नवीन दवाखाने
* अंधेरी, मुलुंड येथे क्रीडा संकुल
* टप्प्याटप्प्याने स्मशानभूमीतून लाकडाचा वापर बंद, पीएनजीवर आधारित ग्रीन स्मशानभूमी होणार
* गारगाईसाठी पाच वर्षे, तर पिंजाळ-दमणगंगासाठी आठ वर्षे लागणार
* गोरेगाव व अंधेरी येथे नाटय़गृह
* अग्निशमन दलाची दहा लघु फायर स्टेशन सुरू करणार.
* डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी दहा कोटी
* पालिका इमारतींच्या दुरुस्ती-पुनर्बाधणीसाठी ५४१.५० कोटी
* व्हच्र्युअल क्लासरुम १२.६२ कोटी
* एकात्मिक गलिच्छ वस्ती विकासासाठी ५० कोटी
* पर्जन्य जलवाहिन्यांसाठी ११३६.०८ कोटी
* पश्चिम उपनगरातील पुलांसाठी ५० कोटी
* गावठाणे, कोळीवाडे, आदिवासी पाडे, आधार केंद्रे, गलिच्छ वस्त्यांसाठी ७९२३.०८ कोटी
*महिलांसाठी १५ कोटी
*नाल्यांसाठी ६३४.८२ कोटी
*उदंचन केंद्रांसाठी २३२.४१ कोटी
*ब्रिमस्टोवॅड  प्रकल्पाचा खर्च ३८८४ कोटी

More Stories onएलबीटीLBT
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc suffer 540 crore loss due to lbt confusion
First published on: 06-02-2014 at 03:28 IST