राज्य सरकारने सहा वर्षांपूर्वी आदेश देऊनही मंडयांमधील गाळेधारकांकडून वसूल न केलेल्या सेवा कराची पालिका प्रशासनाला आता आठवण झाली आहे. सेवा कराच्या वसुलीसाठी पालिकेने आता मुंबईतील सुमारे ९२ मंडयांमधील गाळेधारकांवर नोटिसा बजावल्या आहेत. अचानक नोटीस हाती पडल्यामुळे आणि कराच्या थकबाकीचा आकडा पाहून गाळेधारकांच्या पोटात गोळा उठला आहे.
मुंबईमधील मंडयांतील गाळेधारकांवर १२.५ टक्के सेवा कर आकारण्याचे आदेश राज्य सरकारने पालिकेला २००७ मध्ये दिले होते. मात्र त्या वेळी पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. आता सहा वर्षांनी पालिकेला या कराची आठवण झाली असून पालिका प्रशासनाने ९२ मंडयांमधील गाळेधारकांना सेवा कर भरण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. गाळेधारकांना २००७ पासून थकलेला हा कर भरावा लागणार आहे. करापोटी हजारो रुपये भरावे लागणार असल्याने गाळेधारकांच्या पोटात गोळा उठला आहे.
या मंडयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असुविधा आहेत. पालिका अधिकारी त्याकडे कधीच लक्ष देत नाहीत. काही मंडया मोडकळीस आल्या असून त्यांच्या दुरुस्तीचा पत्ता नाही. मग हा सेवा कर आम्ही का भरायचा, असा सवाल गाळेधारकांकडून करण्यात येत आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सध्या आचारसंहिता जारी आहे. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या प्रश्नाबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल. तसेच प्रशासनाने सेवा कराबाबत पुनर्विचार करावा, असेही आयुक्तांना सूचित करण्यात येईल, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले.