मुंबई : प्रशासनाने मुंबई महानगरपालिकेतील २२ विभागांमध्ये खाजगीकरण करण्याचा घाट घातला असून या खाजगीकरणाला पालिकेतील कामगार, कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहेत. यापूर्वी खाजगीकरणाविरोधात दोन वेळा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आता लवकरच संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला असून हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. महानगरपालिकेतील घन कचरा व्यवस्थापन खात्यात काम करणारे मोटरलोडर कामगार आणि परिवहन खात्यातील कामगारांचे कायमस्वरूपी काम काढून ते कंत्राटदारामार्फत करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
याबाबतची निविदा १४ मे रोजी काढण्यात आली. मात्र, या खाजगीकरणाला कामगार, कर्मचाऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. खाजगीकरणाचा निर्णय मागे घेण्यात यावी, अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. ही निविदा रद्द न झाल्यास सर्व कामगार, कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील, अशी भीती त्यांना सतावत आहे.
तसेच वारसा हक्क (पी.टी. केस) नोकरी धोक्यात येणार असल्याची चर्चा कामगार वर्गात सुरू आहे. याबाबत दोन वेळा मेळावेही घेण्यात आले. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आंदोलनावर ठाम आहेत. त्याचा भाग म्हणून कृती समितीने १५ जुलै रोजी संप करावा की करू नये, यासाठी मतदान घेणार आहे. त्यानंतर १६ जुलै रोजी विधानसभेवर कामगार आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
खाजगीकरणामुळे महापालिकेच्या २२ विभागातील सफाई कामगार, मोटार लोडर, तसेच २४ यानगृहांतील सर्व कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याचे मत समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे. यासंदर्भात अनेक राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदने देण्यात आली आहेत. संघर्ष समितीच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी समितीला दिले. त्यावेळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, निमंत्रक वामन कविस्कर, यशवंतराव देसाई, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम, सत्यवान जावकर, संजय कांबळे – बापेरकर, मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे शेषराव राठोड, संजीवन पवार, दि म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, म्युनिसिपल मजदूर संघाचे प्रकाश जाधव, संजय कापसे आणि कचरा वाहतूक श्रमिक संघाचे ॲड्, दीपक भालेराव व मिलिंद रानडे उपस्थित होते.