मुंबई : मुंबईत शुक्रवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसात मुंबई महापालिकेची यंत्रणा कार्यरत होती. महानगरपालिकेचे तब्बल १० हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी उपस्थित राहून शहर सुरळीत सुरू ठेवण्यासाठी काम करीत होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत होते.
मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. त्यातच दुपारी पाऊण वाजता मोठी भरती येणार होती. त्यावेळी पावसाचा जोर वाढला असता तर मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता होती. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सकाळी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, सर्व सहायक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर) आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात किंवा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहावे, उप आयुक्तांनी खातरजमा करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. सर्व विभागप्रमुख, अभियंते, पंप चालक, आरोग्य कर्मचारी आणि आपत्कालीन पथक यावेळी रस्त्यावर तैनात होते. तब्बल १० हजार कर्मचारी पावसात कार्यरत होते.
पावसाचा जोर वाढल्यामुळे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचारी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी तत्काळ नोंदवून संबंधित विभागांना पाठवत होते. पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारा कचरा, तरंगता घनकचरा मनुष्य प्रवेशिका (मॅनहोल) किंवा नाल्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी ठिकठिकाणी कार्यरत राहून सेवा बजावत होते. भर पावसातही परिसर स्वच्छ राहावा, दुर्गंधी पसरू नये आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी प्रयत्न करीत होते.
संपूर्ण मुंबई महानगरात पाणी साचण्याच्या ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४० उदंचन संचांची व्यवस्था करण्यात आली होती. हे उदंचन संच कार्यरत राहावे, यासाठी पंप चालक तैनात करण्यात आले होते.