सुशांत मोरे, लोकसत्ता

रेल्वेचे डबे, स्थानक परिसर, फलाटावरील प्रवाशांच्या सर्व घडामोडींवर आता मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील (खांद्यावर) ‘बॉडी कॅमेऱ्यां’मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वे सुरक्षा दलाने ४० बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.

रेल्वे सुरक्षा दलावर रेल्वेच्या मालमत्तेबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेचीही जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना त्यांना रेल्वे स्थानकांतील सीसी टीव्ही कॅमेऱ्याची मदत होते. त्याव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्यक्षात सुरक्षा कर्मचाऱ्यासाठी ४० बॉडी कॅमेरे घेण्याचाही निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा; दोन्ही गट आमनेसामने

अनेकदा प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान चोरीला जाते, वादविवाद होतात, छेडछाडीच्या घटना घडतात. तसेच स्थानक परिसरात संदिग्ध पद्धतीने फिरणे, एखादी बेवारस वस्तू ठवणे असे प्रकारही घडतात. या प्रकारांवर बारिक नजर ठेवण्यासाठी बॉडी कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे. तसेच रेल्वे स्थानक किंवा धावत्या रेल्वेत प्रवासी किंवा अन्य रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांची गैरवर्तवणुकही या कॅमेऱ्यात कैद होणार आहे. त्यामुळे सुरक्षा दला पुरावाच उपलब्ध होणार आहे. या कॅमेऱ्यांमध्ये बंदिस्त होणारे चित्रण ३० दिवसांपर्यंत सुरक्षित राहणार आहे. मध्य रेल्वेवरील लांबपल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणाऱ्या टर्मिनस आणि काही स्थानकांतील घडामोडीवर या कॅमेऱ्यांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मुंबई विभागात मेल-एक्स्प्रेस डब्यातील सुरक्षा दलाकडे हे बॉडी कॅमेरे असतील. यासंदर्भात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ऋषी शुक्ला यांनी ४० बॉडी कॅमेरे घेण्यात येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. याची निविदा प्रकिया पूर्ण झाली असून एक महिन्यात हे कॅमेरे मिळतील, असे त्यांनी सांगितले. सध्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील सुरक्षा दलाकडेही ४० बॉडी कॅमेरे आहेत.