मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री करिष्मा शर्मा लोकलमधून पडून जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चर्चगेट स्थानकाजवळ लोकलमधून उडी मारल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरून दिली आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.

असा घडला अपघात

करिष्मा शर्मा ही ‘रागिणी एमएमएस रिटर्न्स’ आणि ‘प्यार का पंचनामा’ आदी चित्रपटांतून प्रसिध्दीला आली. या अपघाताबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावरून माहिती दिली आहे. चित्रिकरणासाठी करिष्मा आपल्या सहकाऱ्यांसह निघाली होती. चित्रिकरणासाठी तिने साडी परिधान केली होती. चर्चगेट स्थानकातून तिने लोकल पकडली. त्यावेळी तिचे सहकारी मागेच राहिले. ते पाहून करिष्माने चालत्या लोकलमधून उडी मारली. परंतु लोकलने वेग घेतला होता. त्यामुळे तिचा तोल गेला. ती फलाटावर पडली. तिच्या डोक्याला मार लागला आहे. याशिवाय पाठ आणि हाताला दुखापत झाली आहे. अपघातानंतर ती बेशुध्द झाली होती. तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात काही क्षणात घडला आणि आम्हाल काय झाले ते क्षणभऱ कळलेच नाही, असे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताबाबत अद्याप रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही.

‘मी लवकर बरी होईन’

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत करिष्माने या अपघाबाबत चाहत्यांना संदेश दिला आहे. साडी घातल्यामुळे मला धावत्या लोकलमधून योग्य प्रकारे उडी मारता आली नाही, म्हणून मी पडले, असे तिने सांगितले. तेव्हा मी बेशुध्द होते. परंतु आता ठिक आहे. लवकरच मी ठणठणीच बरी होईन परतेन, असे तिने या स्टोरीत म्हटले आहे.

कोण आहे करिष्मा शर्मा ?

करिष्मा शर्माने ‘फसते फसाते’, ‘सुपर ३०’ ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आदी चित्रपटात काम केले आहे. याशिवाय ‘पवित्र रिश्ता’ ‘ये है मोहबत्ते’, ‘प्यार तुने क्या किया’ आदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहे. ‘रागिणी एमएमएस रिटर्न्स’ आणि ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटांमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिध्दी मिळाली.