मुंबई : बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये (बीएसई) बॉम्ब ठेवल्याची धमकी सोमवारी अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाली. कॉम्रेड पिनाराई विजयन या नावाने हा धमकीचा ई-मेल पाठविण्यात आला आहे. इमारतीमध्ये चार आरडीएक्स व आईडी ठेवले असून त्याचा बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी ई-मेलमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बीएसईच्या फिरोज टॉवर इमारतीत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल होता. बीएसईचा अधिकृत ई-मेल व बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकार (सीईओ) यांच्या ई-मेलवर हा धमकीचा ई-मेल आला होता. त्यात धमकी देणाऱ्या पिनाराई विजयन नावाने ई-मेलवरून धमकीचा ई-मेल पाठवला आहे. त्यासाठी आऊटलूट ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये बीएसईच्या इमारतीमध्ये चार आईडी व आरडीएक्स फिरोज टॉवरमध्ये ठेवले आहे. दुपारी ३ पर्यंत बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने इमारतीची तपासणी करण्यात आली. पण काहीही संशयास्पद सापडले नाही. याप्रकरणी सहाय्यक व्यवस्थापक सुजीत जाधव यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी धमकी देऊन भीती निर्माण केल्याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
धमक्यांचे सत्र सुरू
मुंबईतील शिक्षण संस्थांना धमक्यांचे सत्र सुरूच असून गेल्या दोन महिन्यांत ११ आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षणिक संस्थांना धमक्यांचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. धमकीच्या ई-मेलसाठी स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, नॉर्वेमधील व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. मुंबईतील शाळांना धमकीचे ई-मेल पाठवल्याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात मे व जून या दोन महिन्यांत ११ आंतरराष्ट्रीय शाळा व शैक्षिणक संस्थांना धमकीचे ई-मेल आले आहेत. त्यात डोंबिवलीतील एक शाळा आणि पवईतील नामांकीत शिक्षण संस्थेचा समावेश आहे.
आरोपीने धमक्यांच्या ई-मेलमध्ये मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब, संसंदेवर हल्ला करणारा अफजल गुरू, तसेच हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यात आरडीएक्स, तसेच बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. सर्व ई-मेलमधील मजकूर सारखाच आहे. आरोपीने पोलीस व सुरक्षा यंत्रणांना फसवण्यासाठी ई-मेल पाठवण्यासाठी बहुतांश वेळा परदेशी व्हीपीएनचा वापर केला आहे. त्यात नॉर्वे, ऑस्टेलिया, स्वीडन, अमेरिका या देशांच्या व्हीपीएनचा समावेश आहे. काही ई-मेलमध्ये दिल्लीतील व्हीपीएनचा वापर करण्यात आला आहे. त्यातही काही प्रकरणांमध्ये आऊटलुक ई-मेल आयडीचा वापर करण्यात आला आहे.