मुंबईः मुंबईतील सांताक्रुझ येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या स्वागत कक्षात एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून हॉटेलच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याची आणि त्याचा दहा मिनिटांत स्फोट होणार असल्याची धमकी दिली होती. हा दूरध्वनी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आला होता. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

पोलीस सूत्रांनुसार, हा दूरध्वनी जर्मनीमधून करण्यात आला होता. हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. हॉटेलचा संपूर्ण परिसर बारकाईने तपासण्यात आला, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

दरम्यान, शोध मोहिमेत स्फोटके अथवा धोकादायक वस्तू आढळल्या नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.वाकोला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला असून, सखोल तपास करण्यात येत आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच दूरध्वनी कुठून करण्यात आला होता याबाबत तज्ज्ञांच्या मदतीने तपास करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परिस्थिती नियंत्रणात असून, हॉटेलमधील सामान्य व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. धमकी देण्यासाठी आतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करण्यात आल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.