मुंबई : कोल्हापुरातील एका जैन धार्मिक न्यासाच्या तीन दशकांहून अधिक काळ ताब्यात ठेवलेल्या आणि माधुरी नावाने प्रसिद्ध असलेल्या महादेवी नावाच्या हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील विशेष हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हस्तांतरित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. धार्मिक हक्क आणि प्राणी कल्याण यांच्यातील संघर्षात प्राणी कल्याण हे सर्वोच्च असल्याची टिप्पणीही न्यायालयाने हा निर्णय देताना केली.
महादेवीला दोन आठवड्यांच्या आत हस्तांतरित करण्याचे आदेश देताना या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांना आवश्यक परवाने देण्याचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
कोल्हापुरातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थेत १९९२ पासून असलेली महादेवी ही हत्तीण, प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या पेटाने केलेल्या अनेक तक्रारी आणि तपासणीनंतर चर्चेत आली होती. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर न्यासाने केलेल्या याचिकेवर निर्णय देताना या हत्तीणीला जामनगर येथील राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या केंद्रात सद्यस्थितीला २३८ हत्ती आहेत. तसेच, या केंद्राने महादेवीला केंद्रात ठेवण्यास सहमती दर्शवली होती.
धार्मिक परंपरेच्या नावाखाली या हत्तीणीचे व्यावसायिक शोषण केले जात असल्याचा आरोप पेटाने केला होता. तेलंगणा राज्य वक्फ बोर्डाने मोहरमनिमित्त आयोजित केलेल्या मिरवणुकीत या हत्तीणीला सहभागी करण्यात आले होते. त्यासाठी चार लाख रुपये भाडे धार्मिक न्यासाला देण्यात आले होते. वन विभागाची अनिवार्य परवानगी न घेता हे सगळे करण्यात आले होते, असा आरोपही पेटाने केला होता. या हत्तीणीच्या शोषणाची छायाचित्रेही न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्यात हत्तीणीला गोंगाट करणाऱ्या गर्दीत नेण्यात आले. तिला दोरीने बांधण्यात आले व नियंत्रित ठेवण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर करण्यात आला. तिच्या पायाला दुखापत असताना व तिला संधिवाताचा त्रास असूनही नियंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
न्यायालयाने आरोपांच्या शहानिशेसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने जून आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये हत्तीणीच्या अनेक तपासण्या करून अहवाल सादर केले होते, या अहवालात ही हत्तीण सुस्थितीत नसल्याचे म्हटले होते. याशिवाय, तिला विविध शारीरिक त्रास होत असल्याचे, तिच्या शरीराच्या विविध भागांवर दुखापतीच्या जखमा असल्याचे आढळून आले होते.
न्यायालयाचे म्हणणे…
हत्तीणीचा ताबा जामनगरस्थित संस्थेकडे देण्याला विरोध करणारी कोल्हापूर ट्रस्टने केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने हत्तीणीवर सतत होणारे उपचार हे निर्दयी आणि क्रूर असल्याची टिप्पणी केली. हत्तीणीची काळजी घेण्यासाठी याचिकाकर्त्यांनी केलेले प्रयत्न खूपच त्रोटक आहेत आणि ते खूपच विलंबाने करण्यात आले आहेत, त्यामुळे, हत्तीणीला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले. धार्मिक परंपरा मान्य करताना, न्यायालयाने मूक आणि दुर्दैवी प्राण्याचे संरक्षण करण्याच्या पालकत्वाचे कर्तव्यदेखील अधोरेखित केले. तसेच, तिच्या हस्तांतरणाचा आदेश देताना धार्मिक विधींसाठी हत्तीणीचा वापर करण्याच्या अधिकारांपेक्षा तिचे अस्तित्व आणि चांगले जीवन जगण्याचा अधिकार विचारात घेतल्याचे न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले. जामनगर येथील केंद्राकडे या हत्तीणीसाठी नैसर्गिक वातावरण, व्यावसायिक पशुवैद्यकीय काळजी आणि सामाजिक अधिवास प्रदान करण्याची क्षमता आहे, असेही न्यायालयाने म्हटले.