मुंबई : अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा विभक्त पती आदिल दुर्राणी यांनी त्यांच्यातील वाद सामंजस्याने मिटवला आहे. तशी माहिती दोघांनीही बुधवारी उच्च न्यायालयात दिली. त्याची दखल घेऊन, राखी आणि आदिल यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी तक्रारी न्यायालयाने रद्द केल्या.
राखी आणि आदिल यांच्यातील वाद हा वैवाहिक संबंधातून उद्भवला होता. तथापि, दोघांनी त्यांच्यातील वाद सौहार्दाने मिटवला आहे. त्यामुळे, त्यांच्याविरुद्ध दाखल प्रकरण प्रलंबित ठेवण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने राखी आणि आदिल यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा व आरोपपत्र रद्द करताना स्पष्ट केले.
राखी आणि आदिल दोघेही यावेळी सुनावणीसाठी उपस्थित होते व दोघांनीही एकमेकांविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्यास त्यांची काहीही हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर, न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. दरम्यान, आदिल याने आपल्याला धमकावल्याचे, छळ आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप राखी हिने तक्रारीत केला होता, तर राखी हिने आपल्या काही अश्लील चित्रफिती मित्रांना पाठवल्या आणि आपली बदनामी केली, असा आरोप आदिल याने केला होता.
या जोडप्याने २०२२ मध्ये इस्लामिक पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर, फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्याआधारे पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता. तथापि, वाद सामंजस्याने मिटवल्यानंतर राखी आणि आदिल यांनी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव धेतली होती.