Bombay HC shifts Sanatan Sanstha defamation case अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर यांच्यासह काही पत्रकारांनी सनातन संस्थेकडून जीवाला धोका असल्याची व्यक्त केलेली भीती वाजवी आणि खरी असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. तसेच, उजव्या विचारसरणीच्या संस्थेने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले मानहानीचे खटले गोव्यातील न्यायालयातून महाराष्ट्रात वर्ग करण्यास परवानगी दिली.

सनातन संस्था आणि याचिकाकर्त्यांमधील वैचारिक शत्रुत्त्व तसेच त्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांनी व्यक्त केलेली भीती विचारात घेतल्यास त्यांच्याविरुद्ध गोव्यातील न्यायालयात दाखल मानहानीचे खटले महाराष्ट्रातील न्यायालयात खटले वर्ग करणे योग्य होईल, असेही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्यांविरोधातील सर्व खटले गोव्यातील फोंडा येथील न्यायालयातून कोल्हापूर येथील न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले.

तथापि, संस्थेच्या विनंतीवरून न्यायालयाने सहा आठवड्यांसाठी आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. दरम्यान, दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले असून सनातन संस्था आणि इतर संघटनांनी दाभोलकरांच्या अंधश्रद्धेविरुद्धच्या कारवायांना तीव्र विरोध केला होता, असे सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचेही एकलपीठाने आदेशात नमूद केले. सनातन संस्थेविरोधात २०१७ आणि २०१८ मध्ये खोटी आणि बदनामीकारक विधाने करण्यात आली आणि प्रकाशितही केली गेली.

त्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप करून संस्थेने गोव्यातील फोंडा येथील न्यायालयात हमीद दाभोलकर यांच्यासह काही पत्रकारांविरुद्ध मानहानीचे खटले दाखल केले होते. तर, सनातन संस्थेचे मुख्यालय गोव्यातील फोंडा येथे असून संस्थेचा गोव्यात दबदबा आहे. याच कारणास्तव आपल्याविरोधातील खटले फोंडा न्यायालयातून महाराष्ट्रातील कोणत्याही न्यायालयात वर्ग करण्याची मागणी दाभोलकर आणि याचिकाकर्त्या पत्रकारांनी केली होती. फोंडा न्यायालयात खटला चालल्यास हमीद दाभोलकर यांच्याबाबतही कॉ. गोविंद पानसरे, प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारखेच काहीतरी घडू शकते, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली होती.