मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात न्यायाधीश आणि वकिलांची थट्टा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. त्यामुळे, चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या शुक्रवारी हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस या संस्थेने वकील चंद्रकांत गायकवाड यांच्यामार्फत ही याचिका केली होती. तसेच, चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची आणि ‘भाई वकील है’ हे गाणे वगळण्याची मागणी केली होती. या गाण्यामध्ये न्यायक्षेत्र आणि कायदेशीर व्यवसायाचा अपमान करण्यात आल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला होता.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे बुधवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, चित्रपट आणि गाण्यात केवळ वकिलांचीच नाही तर न्यायाधीशांचीही थट्टा करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. चित्रपटातील एका दृश्यात न्यायाधीशांना ‘मामू’ असे संबोधण्यात आले आहे याकडे लक्ष वेधून हा शब्द न्यायव्यवस्थेचा अपमान करणारा आणि अपमानजनक असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला.
तथापि, आम्ही अशा प्रकारांची काळजी करत नसल्याचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले. आम्हाला पहिल्या दिवसापासूनच थट्टा सहन करावी लागते. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची काळजी करू नये, असे नमूद करून न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. तत्पूर्वी, चित्रपटाविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात अशाच आशयाची याचिका करण्यात आली होती. परंतु, ती फेटाळण्यात आल्याचे चित्रपट निर्मात्यांनी खंडपीठाला सांगितले.