मुंबई : पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांचे दहन करण्यासाठी मुंबईत विद्युत दहनवाहिनी नसल्याची उच्च न्यायालयाने बुधवारी स्वत:हून दखल घेतली. तसेच, याबाबत महापालिकेला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

‘प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीची प्रतीक्षाच’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने प्राण्यांसाठीच्या विद्युत दहनवाहिनीबाबत महापालिकेच्या वकिलांकडे विचारणा केली. त्यावेळी देवनार येथील दहनवाहिनीचे बांधकाम सुरू असून महालक्ष्मी येथील दहनवाहिनी आधीच कार्यरत असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने वकील ऊर्जा धोंड यांनी न्यायालयाला दिली. तसेच, देवनार येथील दहनवाहिनीच्या बांधकामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली.

पश्चिम उपनगरात मालाड येथेही प्राण्यांसाठीची दहनवाहिनी सुविधा उपलब्ध असल्याचे धोंड यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, मालाड येथील दहनवाहिनीची स्थितीही न्यायालयाने यावेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, प्राण्यांच्या दहनवाहिनी सुविधेच्या सद्यस्थितीबाबत दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले.

‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी दहनवाहिनी बांधण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार होते. तथापि, दहनवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या नैसर्गिक गॅस वाहिनीचे काम रखडल्यामुळे प्राण्यांसाठीच्या या दहनवाहिनीच्या कामालाही खीळ बसली होती. महानगरपालिका प्रशासनाने मालाड येथे १५ सप्टेंबर २०२३ रोजी पाळीव, तसेच रस्त्यावरील मोकाट प्राण्यांना दहन करण्यासाठी नैसर्गिक वायूवर आधारित दहनवाहिनी सुरू केली. प्राण्यांसाठीच्या या दहनवाहिनीला नागरिक आणि प्राणीप्रेमींचा प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात घेऊन देवनार पशुवधगृहातही दहन वाहिनीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार देवनार पशुवधगृहात प्राण्यांसाठी दहनवाहिनी बांधण्याचे काम सुरू करण्यात आले.

प्रकरण काय ?

मालाड येथील दहनवाहिनीत शहर आणि पश्चिम उपनगरांतील अनेक प्राण्यांचा दहनविधी करण्यात येतो. पूर्व उपनगरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने देवनारमध्ये प्राण्यांची दहनवाहिनी बांधण्यात येत आहे. त्या दहनवहिनीला महानगर गॅसतर्फे वायुपुरवठा केला जाणार असून दहनवाहिनीचे काम गतवर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक महिन्यांपासून वायूवाहिनीचे काम तांत्रिक अडचणींमुळे अडकले आहे. तसेच, आता पावसाळा तोंडावर आल्यामुळे हे काम आणखी धीम्या गतीने होण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना या सेवेसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचा दावा

दहनवाहिनीची क्षमता ५० किलो असून एकाच वेळी १० ते १२ किलो वजनाच्या पाच प्रण्यांवर दहनविधी करता येणार आहे. ही व्यवस्था पर्यावरणपूरक म्हणजेच पीएनजीवर आधारित असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असा दावा महापालिकेने या दहनवाहिनीचा निर्णय जाहीर करताना केला होता. गॅसवाहिनीच्या जोडणीचे काम रखडले असून दहनवाहिनी ऑगस्टपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले होते.