मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बालरोग विभागातील बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) सेवांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हा उपक्रम मुंबईसह देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवे बळ देतानाच अत्याधुनिक उपचारसेवेच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत विविध सेवा सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या बालरोग विभागात विविध अत्याधुनिक उपचार सुविधा आणि विशेष विभागांची उभारणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बालरोगीय रक्तविज्ञान व कर्करोग शाखेत अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला जात आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त बालरुग्णांना अत्याधुनिक आणि सुलभ उपचार उपलब्ध होणार आहेत.
सध्या या रुग्णालयात दरवर्षी सुमारे २० अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जातात.आगामी काळात ही संख्या सहा पटीने वाढून तब्बल १२० प्रत्यारोपणांपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच प्रत्यारोपण क्षमतेत ४०० टक्क्यांची अभूतपूर्व वाढ होणार आहे. या विस्तारामुळे थॅलेसेमिया, सिकलसेल आजार, ल्यूकेमिया आणि अॅप्लास्टिक अॅनिमिया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळेवर, अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या उपचारांची संधी उपलब्ध होईल. जे उपचार आतापर्यंत अनेक कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या अशक्य होते ते आवाक्यात येतील.
लोकनेते एकनाथराव गायकवाड अर्बन हेल्थ सेंटर येथे अत्याधुनिक अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभाग उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे. जानेवारी २०२६ पासून रुग्णांना उपचारासाठी प्रवेश दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मानकांनुसार सुसज्ज असलेल्या या केंद्रात आधुनिक वैद्यकीय सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि उच्च जोखमीच्या रुग्णांसाठी स्वतंत्र संरक्षणयुक्त वॉर्ड उपलब्ध असणार आहे. यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारा उपचाराचा नवा अध्याय सुरू होईल.
या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीसाठी ‘वेहा फाउंडेशन’चे सहकार्य लाभले आहे. या संस्थेने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत ही सुविधा उभारली आहे. पुढील दहा वर्षांपर्यंत केंद्राच्या संचालनाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा दीर्घकालीन, शाश्वत आणि परिणामकारक प्रभाव सुनिश्चित होणार आहे. तसेच, डॉ. नवीन खत्री आणि त्यांचा अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरइसी) येथील कुशल चमू यांनी या प्रकल्पासाठी अमूल्य तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहाय्य प्रदान केले आहे.
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, अस्थिमज्जा प्रत्यारोपण सेवांचा विस्तार हा लोकमान्य टिळक रुग्णालयासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. या उपक्रमामुळे हे रुग्णालय भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील अत्याधुनिक रक्तविज्ञान व कर्करोग उपचार क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून उदयास येत आहे. मुंबईतील वंचित, दुर्बल आणि गरजू रुग्णांना उत्कृष्ट व सुलभ वैद्यकीय सेवा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. वेहा फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आम्ही आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या युगाची सुरुवात करत आहोत.
