प्रादेशिक भाषा जिवंत रहाव्यात यासाठी ग्रामीण महाराष्ट्रातील शाळकरी मुलांना वाचनाची आणि त्यावर व्यक्त होण्याची गोडी लागणे गरजेचे आहे हे ओळखून ‘रूरल रिलेशन्स’ या स्वयंसेवी संस्थेने ग्रामीण भागात सुरू केलेल्या ‘ग्यान-की’ (ज्ञानाची गुरुकिल्ली) या ग्रंथालय योजनेस, गावाबाहेर राहणाऱ्या गावकऱ्यांकडून मदतीचा भरघोस ओघ सुरू झाला आहे. आजपर्यंत या गावकऱ्यांनी दोन कोटी १६ लाख ४० हजार रुपये किंमतीची जवळपास सव्वासात लाख पुस्तके ‘ग्यान-की’साठी दान केली असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात दररोज तीन नवी ‘ग्यान-की’ ग्रंथालये सुरू करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट सफल झाले आहे.

ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये ‘विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी चालविलेले ग्रंथालय’ अशी ‘ग्यान-की’ योजनेची संकल्पना आहे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ हे केवळ भिंतीवरचे घोषवाक्य न राहता, खरोखरीच मुलीला प्रोत्साहन मिळावे, तिच्या नेतृत्वगुणांना संधी मिळावी यासाठी प्रत्येक शाळेतील ग्रंथालयात ‘मॉनिटर’ म्हणून मुलगीच काम पाहील असे जाणीवपूर्वक ठरविण्यात आले. नोकरी-व्यवसायानिमित्त गावाबाहेर राहणाऱ्या गावकऱ्यांकडून या योजनेसाठी पुस्तके मिळावीत याकरिता संस्थेने आवाहन केले, आणि असंख्य हातांनी त्याला भरभरून प्रतिसाद सुरू केला. संस्थेने या गावकऱ्यांना ‘एनआरव्ही’ (नॉन रेसिडेंट व्हिलेजर्स) असे म्हटले आहे. या गावकऱ्यांनी सहा हजार सहाशे रुपये वितरकाकडे जमा केल्यानंतर आठ हजार तीनशे रुपयांचा दोनशे पुस्तकांचा संच शाळेत पाठविला जावा, अशी योजना संस्थेने तयार केली आहे. यातूनच गेल्या सुमारे तीन वर्षांत ग्रामीण महाराष्ट्रातील शाळांमध्ये विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना असलेली ३६४० ‘ग्यान-की’ ग्रंथालये उभी राहिली आहेत, आणि सुमारे दहा लाख विद्यार्थी या ग्रंथालयांचा लाभ घेऊन वाचनसंस्कृती जोपासत आहेत. या ग्रंथालयांमुळे ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची गोडी तर लागलीच, पण वाचलेल्या पुस्तकावर व्यक्त होण्याचीही सवय लागली. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर प्रतिक्रियेच्या स्वरूपात मत मांडणारी ‘रूरल रिलेशन्स’च्या कार्यालयात आलेली सुमारे दोन लाख पत्रे याची साक्ष देतात.

ग्रामीण भागात वाचनाचा प्रसार करणारी ही जगाती सर्वात मोठी मोहीम ठरावी यासाठी पुणे येथील या रूरल रिलेशन्स संस्थेचे कार्यकर्ते झापाटले असून येत्या काही वर्षांत देशभरात अशी सुमारे ९४ हजार ‘ग्यान-की’ ग्रंथालये सुरू करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे यांनी सांगितले.