मुंबई : माहीम रेल्वे स्थानकाजवळच्या सेनापती बापट मार्गावरील तीन मजली इमारतीचा अनधिकृत भाग पडताना संपूर्ण इमारत कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माहीम परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

माहीममधील उन्नती सोसायटी या तीनमजली इमारतीलगत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत बुधवारी हाती घेण्यात आली होती. मात्र, कारवाई सुरू असताना संपूर्ण तीन मजली इमारत क्षणार्धात जमीनदोस्त झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य हाती घेतले. दरम्यान, या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना बाहेर काढले. तसेच, जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रहेजा रुग्णालयात नेण्यात आले.  सद्यस्थितीत अग्निशमन दलातर्फे घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.