भविष्यात स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यास शहरातील व्यापारी तसेच उद्योजक महापालिका प्रशासनास पूर्णपणे पाठिंबा देतील, असे आश्वासन आज संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले. महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, उपायुक्त अशोककुमार रणखांब, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकाडी, जकात विभागाचे उपायुक्त के.डी. निपुर्ते यांनी बैठकीमध्ये उपस्थित व्यापारी तसेच उद्योजकांना मार्गदर्शन केले. शासनाने ‘ड’ वर्ग महापालिकांच्या हद्दीतील जकात कर रद्द करून त्याऐवजी अकाऊंट बेस प्रणाली आधारित स्थानिक कर लागू केला आहे.
आता शासन ‘अ’, ‘ब’,  आणि ‘क’ दर्जाच्या महापालिका क्षेत्रातील जकात रद्द करून स्थानिक कराची अंमलबजावणी करण्याच्या विचारात आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने शहरातील संबंधितांची या विषयाबाबतची मते जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. स्थानिक कर कसा भरावा, लेख कसे तयार करावेत, याविषयी बैठकीत माहिती देण्यात आली.