मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेत गेल्या सहा वर्षात २७५ प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याचे माहिती अधिकारातील आकडेवारीतून पुढे आले आहे. तर याच सहा वर्षात २८६ प्राणी पक्षांचा जन्मही झाला आहे. तर गेल्या वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला असून त्यात सहा चितळ, एक हत्ती, कासव, पोपट यांचा समावेश आहे.
भायखळा येथील मुंबई महापालिकेच्या प्राणी संग्रहायलयात विविध प्रजातींच्या प्राणी व पक्ष्यांचा अधिवास आहे. प्राणी संग्रहायलयातील प्राणी व पक्ष्यांच्या मृत्यू व जन्मासंदर्भातील आकडेवारी वॉचडॉग फाऊंडेशन या संस्थेने माहिती अधिकारात मागितली होती. त्यानुसार २०१९ ते २०२५ या कालावधीत २८६ प्राणी पक्षी यांचा जन्म झाला आहे. तर २७५ प्राणी पक्षी या कालावधीत मृत झाले आहेत.
मात्र मृत पक्षांचे प्रमाण हे गेल्या सहा वर्षात कमी कमी झाले आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत एका वर्षात ७० प्राणीपक्षी मृत झाले होते. तर तेच प्रमाण २०२४-२५ या कालावधीत २५ असल्याचे आकडेवारीवरून दिसते. यामध्ये कासव, रंगीत करकोची, सांबर, बगळा, हत्ती, तरस, चितळ यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत एकूण १६ नवीन प्राणी पक्षी जन्माला आले आहेत. त्यात तीन पेंग्विन, चितळ, हरिण, बगळा, माकड, पोपट, रंगीत करकोटा, यांचा समावेश आहे.
दरम्यान, प्राणी संग्रहायलयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गेल्या सहा वर्षात प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच यापैकी बहुतांशी मृत्यू हे वृद्धापकाळाने झालेले आहेत. मुख्यतः वृद्धापकाळ, प्राणी-पक्ष्यांमधली झटापटी, त्यातून होणाऱ्या जखमा, अतिरिक्त रक्तस्त्राव अशा अनेक बाबींचा समावेश असतो.
तसेच समूहाने राहणाऱ्या प्राण्यांमध्ये (हरीण, पक्षी, माकड इत्यादी) वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेकदा झटापटी होतात. त्यांना इजा होते. अस्तित्व राखण्यासाठी किंवा क्षीण, वयस्कर, आजारी असलेल्या प्राण्यांना समुहातून वेगळे करण्यासाठी प्राण्यांमध्ये झटापटी होतात आणि यातूनच जखमी होवून बऱ्याचदा प्राण्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. त्रिपाठी यांनी दिली. यामध्ये जंतुसंसर्गामुळे किंवा व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे झालेले मृत्यू नाहीत असाही दावा त्यांनी केला आहे.
वर्ष…………………जन्म………….मृत्यू
२०१९-२०…………….५६……….७०
२०२०-२१…………….१४…………५९
२०२१-२२…………….४४…………५०
२०२२-२३…………….६२……….४३
२०२३-२४…………….३०………२८
२०२४-२५…………….५०………..२५
एकूण……………….२८६……….२७५