मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या फाउंडेशन, इंटरमीडिएट आणि अंतिम सीए परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम परीक्षेमध्ये देशातून मध्य प्रदेशमधील धमनोड येथील मुकुंद अगिवाल अव्वल आला आहे. तसेच फाऊंडेशन परीक्षेमध्ये चेन्नईमधील एल. राजलक्ष्मी आणि इंटरमीडिएट परीक्षेत जयपूरमधील नेहा खानवानी अव्वल आली आहे. तसेच फाऊंडेशन व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये तिसरा क्रमांक मुंबईतील नील शाह आणि अक्षत नौटियाल यांनी पटकावला आहे.

सीए अंतिम, फाऊंडेशन, इंटरमीडिएट या तिन्ही परीक्षा सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आल्या होत्या. सीएच्या अंतिम परीक्षेसाठी ग्रुप १ मध्ये ५१ हजार ९५५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १२ हजार ८११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २४.६६ टक्के आहे. तर ग्रुप २ मध्ये ३२ हजार २७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ८ हजार १५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २५.२६ टक्के आहे. तसेच दोन्ही ग्रुपमधून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ८०० होती. त्यातील २ हजार ७२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण १६.२३ टक्के इतके आहे. या परीक्षेमध्ये मध्य प्रदेशमधील धमनोड येथील मुकुंद अगिवाल ५०० गुणांसह ८३.३३ टक्के मिळवून देशात अव्वल आला. त्याखालोखाल हैदराबादमधील तेजस मुंदडाने ४९२ गुणांसह ८२ टक्के मिळवले. तर अल्वर येथील बकुल गुप्ता याने ४८९ गुणांसह ८१.५० टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.

सीए अंतिम परीक्षेपूर्वी सीए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. आयसीएआयकडून सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या या परीक्षेच्या ग्रुप १ मधून ९३ हजार ७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८ हजार ८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९.४३ टक्के इतके आहे. तसेच ग्रुप २ मधून ६९ हजार ७६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १८ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २७.१४ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे दोन्ही ग्रुपमध्ये परीक्षा दिलेल्या ३६ हजार ३९८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण १०.०६ टक्के इतके आहे. यामध्ये जयपूरची नेहा खानवानी हिने ६०० पैकी ५०५ गुणांसह ८४.१७ टक्के मिळवून अव्वल आली आहे. त्याखालोखाल अहमदाबादची क्रिती शर्मा हिने ५०३ गुणांसह ८३.८३ टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. तसेच मुंबईचा अक्षत नौटियाल याने ५०० गुणांसह ८३.३३ टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

सीए फाऊंडेशन ही परीक्षा देशभरातून ५४४ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी देशभरातून ९८ हजार ८२७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मुलांची संख्या ५१ हजार १२० आणि मुलींची संख्या ४७ हजार ७०७ इतकी होती. परीक्षेला बसलेल्यांपैकी १४ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण १४.७८ टक्के इतके आहे. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ हजार ४६ इतकी असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १५.७४ टक्के, तर मुलींची संख्या ६ हजार ५६३ इतकी असून, उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १३.७६ टक्के इतके आहे. फाऊंडेशन परीक्षेमध्ये चेन्नईतून एल. राजलक्ष्मी ४०० पैकी ३६० गुणांसह ९० टक्क्यांनी अव्वल आली आहे. तसेच सूरतमधील प्रेम अगरवालने ३५४ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. मुंबईचा नील शाहने ३५३ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.