मुंबई : सनदी लेखापाल राज मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी एका तरुणीसह दोघांना अटक केली. या दोघांनी राज मोरे यांची अश्लील चित्रफित तयार करून त्याच्याकडून सुमारे ३ कोटी रुपये खंडणी उकळली होती.
सांताक्रूझ येथे राहणाऱ्या राज मोरे (३२) यांनी रविवारी संध्याकाळी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांचा मित्र राहुल पारवानी (२६) आणि सबा कुरेशी (२२) अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत होते. या दोघांनी १८ महिन्यांमध्ये राज यांच्याकडून तीन कोटी रुपये खंडणी उकळली होती. या दोघांच्या त्रासाला कंटाळून राज यांनी आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी त्यांनी ३ चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. राहुल पारवानी आणि सबा कुरेशी यांनी आपल्याला कशा प्रकारे ब्लॅकमेल केले हे त्यांनी चिठ्ठीत सविस्तर लिहिले होते. या चिठ्ठ्या, तसेच राज मोरे यांच्या आईच्या जबाबावरून वाकोला पोलिसांनी या दोघांविरोधात खंडणी उकळणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या दोघांना अंधेरी येथून अटक करण्यात आल्याची माहिती वाकोला पोलिसांनी दिली.
ऑनलाईन गेम आणि शेअर बाजारात गुंतवले पैसे
अटक केलेल्या आरोपींनी खंडणीतून मिळालेल्या पैशांतून मौजमजा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींनी यापैकी काही पैसे शेअर बाजारात गुंतवले होते, तर बराचसे पैसे ऑनलाईन गेममध्ये उधळले होते. दोन्ही आरोपींचे राहणीमान उच्चदर्जाचे होते. त्यासाठी त्यांनी हा पैसा वापरला होता. पोलिसांनी आरोपींच्या बॅंक खात्याचे तपशील मागवले असून हा पैसा कसा आला त्याचा पुरावा जमा केला जाणार आहे.
काय आहे प्रकरण ?
राज मोरे यांची सप्टेंबर २०२४ मध्ये इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर राहुल पारवानी (२६) याच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते दोघे नियमित भेटू लागले. राज आणि राहुल पारवानी यांच्यातील शारिरीक संबंधाची अश्लील चित्रफित तयार करण्यात आली होती.
त्या आधारे दोघांनी राज यांना ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली होती. ही चित्रफित प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. राज यांची महागडी गाडी राहुल पारवानी याने काढून घेतली होती.