मुंबई : राज्यातील भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ॲक्युपेशनल थेरपी) पदव्युत्तर पदवी. तसेच बी.एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता कालावधीतील विद्यावेतनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विद्यावेतनात १ जून २०२५ पासून १० हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
राज्यातील शासकीय भौतिकोपचार (बीपीटी), व्यवसायोपचार (बीओटी) पदवी अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर २६ आठवड्यांचे आंतरवासिता प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे असते. तसेच या भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी इतर विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांप्रमाणे रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग आणि अंतररुग्ण विभागात सेवा देतात. तसेच बी. एस्सी नर्सिंग पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि भौतिकोपचार (एमपीटी) आणि व्यवसायोपचार (एमओटी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आंतरवासिता कालावधीत रुग्णालयामधील अपघात विभाग, रेडिऑलॉजी, ओपीडी, प्रयोगशाळा,कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभागात सेवा देतात.
राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ओक्युपेशनल थेरपी) पदव्युतर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासीता कालावधीत मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ करण्याची गरज निर्माण झाली होती. गेल्या २३ वर्षांपासून या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आलेली नव्हती. भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ओक्युपेशनल थेरपी) यांच्या विद्यावेतनात १ जून २०२५ पासून १० हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. मूळ वेतन व महागाई भत्ता व झालेली वाढ मिळून आता हे विद्यावेतन दरमहा ३३ हजार ७३० रुपये इतके असेल. यासाठीच्या ६७ लाख २० हजार रुपयांच्या आर्थिक तरतुदीसही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि व्यवसायोपचार (ओक्युपेशनल थेरपी) पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बी.एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन
बी.एस्सी नर्सिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १ जून २०२५ पासून ८ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीसही मान्यता देण्यात आली. राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एमपीटी, एमओटी आणि बी.एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी व त्यांची जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून घेण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.