मुंबई : सीबीएसई-आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांपाठोपाठ ‘आयजीसीएसई’ (केम्ब्रिज) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेल्या शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमही मुंबई महापालिका शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंडळाशी झालेल्या करारानुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून पालिकेच्या एका शाळेत प्रायोगिक तत्त्वावर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
अभ्यासक्रम राबविण्यासाठी मुंबई महापालिकेने मंडळाशी बुधवारी सामंजस्य करार केला. अभ्यासक्रम राबविण्याकरिता मंडळातर्फे पालिका शाळांना प्रशासकीय सहकार्य पुरविले जाईल. तसेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. आयसीएसई, सीबीएसईपाठोपाठ याही मंडळाच्या अभ्यासक्रमाचा पर्याय टप्प्याटप्प्याने पालिका शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल ते मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे या वेळी पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. भविष्यात राज्य सरकारमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांनाही असे शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात एका शाळेत हा अभ्यासक्रम सुरू केला जाईल. त्यानंतर आणखी काही शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जाईल.
महत्त्व काय?
‘आयजीसीएसई’ म्हणजे ‘इंटरनॅशनल जनरल सर्टिफिके ट ऑफ सेकंडरी एज्युकेशन’च्या (केम्ब्रिज शिक्षण मंडळ) अभ्यासक्रमांमध्ये जागतिक मूल्यांबरोबरच त्या त्या देशातील भाषा, संस्कृती, इतिहास, समाज आदींची सांगड घातली जाते. तसेच, पाठांतराऐवजी विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञानविषयक तसेच भाषिक संकल्पना स्पष्ट करण्यावर मंडळाच्या अध्ययन पद्धतीचा भर असतो. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.