मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना सशक्त आणि योग्य करिअर मार्गदर्शन मिळावे यासाठी २०२५–२६ या शैक्षणिक वर्षापासून करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक शालेय मॉडेल हे दोन महत्त्वाचे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भवितव्याच्या दृष्टिकोनातून करिअर निवडणे आणि अभ्यास करताना मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत होणार आहे.
करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांबद्दल माहिती, वैयक्तिक मार्गदर्शन, मानसशास्त्रीय चाचण्या, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती आणि महाविद्यालयांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावर ११०० हून अधिक करिअर पर्याय देण्यात आले आहेत. सर्व सीबीएसई शाळांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हा डॅशबोर्ड मोफत उपलब्ध असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://cbsecareerguidance.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.
यासोबतच, सीबीएसईने हब अँड स्पोक मॉडेल सुरू केले आहे. या मॉडेलमध्ये काही निवडक शाळा ‘हब’ म्हणून नियुक्त केल्या जातील, जिथे प्रशिक्षित समुपदेशक आणि मार्गदर्शक असतील. या हब शाळा त्यांच्या परिसरातील इतर शाळा ‘स्पोक’ यांना मार्गदर्शन देतील. हब अँड स्पोक मॉडेलच्या माध्यमातून समुपदेशक करिअर मार्गदर्शनासोबतच मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि विद्यार्थी कल्याणावर लक्ष देतील.
टप्प्याटप्प्याने लागू करणार
सीबीएसईने ऑगस्ट २०२५ पासून हा उपक्रम टप्प्याटप्प्याने देशभर लागू करण्याचे ठरवले आहे. यामध्ये शाळांची नोंदणी, समुपदेशन सत्रे, शिक्षकांचे प्रशिक्षण, आणि विद्यार्थ्यांसाठी करिअर मेळावे यांचा समावेश असेल. या उपक्रमांमुळे ग्रामीण व दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन सहज उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी उपक्रम
दोन्ही उपक्रम शाळा आणि विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या अनुषंगाने तयार केलेले आहेत. करिअर मार्गदर्शन आणि मानसोपचारिक आधाराची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढवणे आहे. शिक्षक आणि समुपदेशक यांच्यामध्ये संस्थात्मक क्षमता निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शाळांनी सीबीएसई कौन्सिलिंग हब आणि स्पोक स्कूल मॉडेलची सक्रियपणे अमलबजावणी करावी, असे आवाहन सीबीएसईकडून करण्यात आले आहे.