मुंबई : अकरावी प्रवेशावेळी अनेक विद्यार्थ्यांचा शाखा निवडताना गोंधळ होतो. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना नाईलाजस्तव आवड नसलेल्या क्षेत्रात शिक्षण सुरू ठेवावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा गोंधळ दूर करण्यासाठी व आवडीच्या क्षेत्रात शिक्षण त्यांना घेता यावे यासाठी शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर पाथ’ हा पर्याय उपलब्ध केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना १५० पेक्षा जास्त करिअर व अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा कल त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्याकडे असतो. मात्र अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी कोणत्या शाखेला प्रवेश घेतला पाहिजे हेच कळत नसते. परिणामी, अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांनी, मित्रांनी सांगितलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यासाठी संबंधित शाखेतून शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे विद्यार्थ्यांना कळते. परिणामी विद्यार्थ्यांना आवड नसलेल्या शाखेतून शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे अकरावी प्रवेशावेळी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा उडणारा गोंधळ दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या व नोकरीच्या संधी असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयाने ‘करिअर पाथ’ हा उपक्रम सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार व ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यानुसार शाखा निवडण्यास मदत करण्यासाठी १५० पेक्षा जास्त करिअर व अभ्यासक्रमांबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी दिली.अकरावी प्रवेशाच्या https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर शिक्षण संचालनालयाकडून ‘करिअर पाथ’ उपक्रमाची लिंक दिली आहे. यामध्ये फ्लोरिस्ट, ॲक्टर, ॲनिमेटर, कला दिग्दर्शक, ब्लॉगर, कॅमेरामन, डान्सर, कॉपी रायटर, पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, मार्केटिंग, टेक्स्टाईल डिझायनर, बँक मॅनेजर, शिक्षक, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय वन सेवा, भारतीय महसूल सेवा, उत्पन्न कर निरीक्षक, पोलीस, क्रीडा प्रशिक्षक, इव्हेंट मॅनेजर, हवाई सुंदरी, टूर ऑपरेटर, वकील, शेफ, एनडीआयएन एअर फोर्स ऑफिसर त्याचबरोबर विविध प्रकारचे इजिनीयर आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरकीबरोबरच निमवैद्यकीय क्षेत्रातील अनेक करिअरची माहिती यामध्ये दिली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कौशल्य विकासांतर्गत उपलब्ध असलेल्या असलेल्या करिअरसाठी करावयाच्या अभ्यासक्रमांचीही माहिती या उपक्रमांतर्गत देण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.