मुंबई : आयआयटीमधील सेवानिवृत्त प्राध्यापकाला त्यांच्याच केअर टेकर महिलेने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. प्राध्यापकांची मुले भेटायला येत नसल्याचे पाहून तिने त्यांना चक्क वृध्दाश्रमता टाकले. त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्या चारही सदनिका स्वत:च्या नावावर करून घेतल्या. याशिवाय वेळोवेळी त्यांच्या बॅंक खात्यातील ६ कोटी ३ लाख रुपये हडप केले.

इलेक्ट्रीक अभिंयता असलेले प्रा. मनमोहन अग्रवाल (८२) हे मुंबईच्या आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते २०२५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून पवईच्या हिरानंदानी गार्डनमधील ग्लेन हाईट या इमारतीत राहतात. त्यांचा एक मुलगा तुषार डॉक्टर असून तो पुण्यातील पिंपरी येथे राहतो. त्यांची पत्नी मिरा मुलाकडे पुण्याला राहते. तर मुलगी मोनिका पवई येथे राहते.

पत्नी आणि मुले सोबत नसल्याने अग्रवाल एकटेच रहात होते. अग्रवाल यांना २०१७ मध्ये निकिता नाईक नावाची एक महिला भेटली. अग्रवाल एकटे रहात असून त्यांचे कुटुंबिय फार लक्ष देत नसल्याचे तिला समजले. निकिताने अग्रवाल यांचा विश्वास संपादन करून ती त्यांची वैयक्तिक केअर टेकर म्हणून काम करू लागली. अग्रवाल यांची वैयक्तिक देखभाल करण्याबरोबरच बाहेरची किरकोळ कामे निकिता करीत होती.

अशी केली फसवणूक

प्रत्यक्षात ती अग्रवाल यांच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करीत होती. अग्रवाल यांची दृष्टी कमी झाल्याने निकिता त्यांची बॅंकेची कामे करू लागली होती. एटीएममध्ये जाणे, ऑनलाइन बिले भरणे आदी कामांसाठी ती अग्रवाल यांचा मोबाइल वापरत होती. अग्रवाल यांची सर्व बॅंक खाती, त्याचे पासवर्ड निकिता नाईकला माहीत होते. तिने त्यांच्या चार बॅंक खात्यांतून १ कोटी ३ लाख रुपये काढून घेतले. अग्रवाल यांची मुले वडिलांना भेटायला येत नसत. त्यामुळे तिने फेब्रुवारी २०२५ मध्ये अग्रवाल यांना विक्रोळी येथील टाऊन विल केअर या वृध्दाश्रमात सोडले.

अग्रवाल यांचे पवईच्या हिरानंदानी संकुलात एकूण ४ सदनिका आहेत. तिने एप्रिल महिन्यात अग्रवाल यांचे कायदा सल्लागार बनण्याची पूर्तता करण्यासाठी, तसेच वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली वृध्दाश्रमातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या चारही सदनिका बक्षीसपात्र (गिफ्ट डीड) करून स्वत:च्या नावावर करून घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॅंकेच्या लॉकरमधील ५ लाख रोख रक्कम, दागिने आणि सदनिकांची कागदपत्रे ६ मे रोजी स्वत:च्या नावावर करून घेतली. दरम्यान, प्रा अग्रवाल यांचा मुलगा तुषार याला आपले वडील वृध्दाश्रमात असल्याचे समजले. त्याने वडिलांची भेट घेतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रा. अग्रवाल यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चोरी, फसवणूक केल्याबद्दल निकिता नाईक हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०६, ३१६ (४), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला. निकिताने २०१७ ते २०२५ या कालावधीत अग्रवाल यांची फसवणूक करून सुमारे ६ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे पवई पोलिसांनी सांगितले.